चोरटे पुण्यातील असल्याचे पोलीस तपासात उघड
| रोहा | वार्ताहर |
चणेरा येथे जात असलेल्या महिलेचे चालत्या दुचाकीवरून मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या पुण्यातील मुळशीच्या तीन चोरट्यांना नागरिकांच्या सतर्कतेने पकडण्यात आले. त्यांना रोहा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
रोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दि. 12 जानेवारी रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान रोहा-रेवदंडा रस्त्यावरील खुटल गावातून फिर्यादी संगीता दिलीप महाले (48) ही महिला चणेरा येथे जात होती. बंटी केंद्रे यांच्या घरासमोर रोहा बाजूकडून दुचाकीवर येणाऱ्या तीन इसमांनी संगनमताने 30 हजार रु. किमतीचे सोन्याचे एकसरी मंगळसूत्र जबरीने हिसकवले. दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावून याठिकाणाहून पळ काढला. याठिकाणी फिर्यादी सौ. महाले यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या तिघांपैकी दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने हाताने फिर्यादीस धक्का दिल्याने त्या रस्त्यात जमिनीवर खाली पडल्या. त्यांच्या कमरेला मुका मार बसला असून, मंगळसूत्र हिसकताना मानेजवळ जखम झाली आहे.
दरम्यान, गावातील काही तरुणांनी त्या दुचाकीवरील चोरट्यांचा पाठलाग करून पकडले. यामधे राजेश हरीचंद्र राजपूत, सचिन तानाजी राजपूत, अरुण कैलास राजपूत या व्यक्ती पुण्यातील मुळशी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. पकडण्यात आलेल्या या तिन्ही चोरट्यांना येथील नागरिकांनी रोहा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील राजेश हरीचंद्र राजपूत हा इसम अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेतले असून, सचिन राजपूत व अरुण राजपूत यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास रोह्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई व्ही.एस. वायंगणकर यांसह सहकारी करीत आहेत.