| मुंबई | प्रतिनिधी |
अमरहिंद मंडळाच्या विद्यमाने 17 ते 21 जानेवारी या कालावधीत “स्व. उमेश शेनॉय स्मृती चषक“ पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गोखले रोड, दादर (प.) येथील मंडळाच्या पटांगणावरील मॅटच्या एका क्रीडांगणावर हे सामने खेळविण्यात येतील. विजय क्लब, अंकुर स्पोर्टस्, शिवशक्ती, जय भारत, लायन्स स्पोर्टस्, ओम् पिंपळेश्वर, जय दत्तगुरु, गोलफादेवी सेवा(सर्व मुंबई शहर), ओवाळी मंडळ, जॉली स्पोर्टस्(उपनगर), श्री विठ्ठल, विजय स्पोर्टस्, शिवशंकर(ठाणे), मिडलाईन(रायगड), श्री राम संघ(पालघर), बाबुराव चांदेरे फाऊंडेशन(पुणे) हे नामांकित 16 संघ या स्पर्धेत आपले कौशल्य दाखविणार आहेत.
या स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघास स्व. उमेश शेनॉय स्मृती चषक आणि रोख रू. पस्तीस हजार , तर उपविजयी संघास चषक आणि रोख रू. पंचवीस हजार प्रदान करण्यात येतील. उपांत्य उपविजयी दोन्ही संघाना प्रत्येकी चषक आणि रोख रू. दहा हजार प्रदान करण्यात येतील. स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या खेळाडूस रोख रू. दहा हजार आणि आकर्षक भेटवस्तू, तर स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचा ठरणाऱ्या खेळाडूस रोख रू. पाच हजार आणि आकर्षक भेटवस्तू बक्षिसादाखल देण्यात येतील. त्याच बरोबर प्रतिदिनीच्या मानकऱ्यास रोख रू. एक हजार व भेटवस्तू प्रदान करण्यात येईल. स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येईल. क्रीडा रसिकांकरीता तिन्ही बाजूने आकर्षक प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. स्पर्धेत कोणतीही कसर राहू नये म्हणून स्पर्धा प्रमुख साईनाथ काळसेकर आपल्या सर्व सहकाऱ्यांसह जातीने लक्ष ठेऊन आहेत. अशी माहिती एका पत्रकाद्वारे मंडळाचे सचिव रवींद्र ढवळे यांनी सर्व प्रसार माध्यमांना दिली आहे.