| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कुर्डूसमध्ये शिंदेगटात राडा झाल्याची घटना समोर येत आहे. मंगळवारी दुुपारी मासिक सभेत निधी वाटपावरून आणि ठरावाला मंजूरी देण्यावरून हा वाद चांगलाच पेटला. सदस्यांनी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकून जखमी केले. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुर्डूस ग्रामपंचायतीची मासिक सभा मंगळवारी (दि.17) सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत शिंदे गटाचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामसेवक प्रोसिडींग वाचत असताना छाया पिंगळे यांच्या नावे असलेल्या गट नं. 191 या जागेबाबतचा विषय आला. त्यावेळी तुषार शेरमकर यांनी या जागेवर 49 हजार रुपयांचा निधी टाका, असे सांगितले. त्यावर छाया पिंगळे यांनी विरोध केल्यावर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. रागाच्या भरात शेरमकर यांनी पिंगळे यांच्या अंगावर खुर्ची फेकली. यामध्ये त्या जखमी झाल्या. तसेच ग्रामसेवक स्मशानभूमी दुरुस्तीचे प्रोसेडींग वाचत असताना, शेरमकर यांनी त्याला पाठींबा दिला. त्याला छाया पिंगळे व चंद्रकांत पिंगळे यांनी विरोध केला. यावरून दोन गटात भांडण झाले. एकमेकांना शिवीगाळी करून मारहाण करण्याबरोबरच ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
शिंदे गटातील ग्रामपंचायत सदस्यांमध्ये झालेल्या या राड्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार आणि पोलीस हवालदार शेरमकर करीत आहेत.






