| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यात खांडस, ओलमण आणि नांदगाव भागातील शेतकऱ्याच्या मनात गुरे चोरीला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. खांडस भागातील काठेवाडी येथील दोन बैलांची डिसेंबर महिन्यात चोरी झाली असून त्या दोन्ही बैलांचा अद्याप तपास लागलेला नाही. दरम्यान, एका महिन्यात चार जनावरांची चोरी झाल्याने स्थानिक शेतकरी प्रचंड तणावाखाली आहेत.
डामसेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतमधून 16 जानेवारी रोजी दोन बैलांची चोरी करण्याची घटना ताजी असताना आणखी दोन बैलांच्या चोरीचे प्रकरण समोर आले आहे. याच परिसरातील काठेवाडी येथील दोन शेतकऱ्यांच्या गोठ्यात बांधलेले बैल चोरून नेण्यात आले होते. 20 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती आणि त्यानंतर 21 डिसेंबर रोजी पोलिसात तक्रार देखील देण्यात आली होती. मात्र, मागील महिनाभरात त्या दोन्ही बैलांचा कोणताही तपास लागलेला नाही. तेथील शेतकरी सुरेश उगले आणि जगन काठे या दोन्ही शेतकऱ्यांचे प्रत्येकी दोन बैल यांची 20 डिसेंबरचे रात्री गोठ्यातून पळवून नेत चोरी करण्यात आली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी रात्रभर आसपासचा परिसर पिंजून काढले. नंतर त्या शेतकऱ्यांचा प्रत्येकी एक-एक बैल हा जंगलातून परत आपल्या गोठ्याकडे आला होता. परंतु जगन काठे आणि सुरेश उगले या शेतकऱ्यांचे प्रत्येकी एक-एक बैल मात्र अद्याप घराकडे परतले नाहीत. त्याबद्दल सुरेश उगले यांनी नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्ट येथे जावून तक्रार नोंद केली होती. मात्र, पोलिसांकडून अद्याप त्या दोन्ही बैलांची चोरी करणाऱ्यांचा शोध लागला गेला नाही. त्यामुळे आता नेरळ पोलिसांसमोर गुरे चोरणाऱ्या टोळीला पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.