| नाशिक | प्रतिनिधी |
राज्यव्यापी अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला. प्रभू रामचंद्रांचा एक तरी गुण तुमच्यात आहे हे तरी कळू द्या. प्रभू रामचंद्र एकवचनी होते. सत्य वचनी होते. ज्या शिवसेनेने तुम्हाला ज्या गादीपर्यंत पोहोचवलं, त्या शिवसेनेला दिलेलं वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे होऊ शकता. शिवसेना पळवणाऱ्या, भगव्याशी प्रतारणा करणाऱ्या वालीचा राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही, हा निर्धार करा. आता सर्व राममय झाले आहे. जनतेचे प्रश्न तसेच आहेत. राम की बात झाली, आता काम की बात करो. तुम्ही दहा वर्षांत काय केलं ते सांगा, असं उद्धव ठाकरे यांनी विचारलं.
समर्थ देश करायचं आहे. मग दहा वर्ष अंडी उबवत होता का? पहिल्या पाच वर्षात पंतप्रधान जगभर फिरत होते. पण अयोध्येला गेले नाही. लक्षद्वीपला गेले, मणिपूरला तर नाहीच गेले. म्हणून म्हटलं संध्याकाळी बाकीचे विषय बोलणार आहे. कामगार बेकार होत आहे. सर्वांनी नुसतं राम राम करायचं का, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
गेल्या वर्षभरात अमरावतीत 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पीक विमा नाही, नुकसानाभरपाई नाही. दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत. कुणाला तरी पकडतात आणि यांच्यामुळे हक्काचं घर मिळालं सांगतात. चॅनलवरही दबाव एवढा आहे की ते म्हणतील तेच दाखवतात. काही ठिकाणी केबलही बंद करतात. हिंमत असेल तर मैदानात या, कोण काय आहे ते दाखवतो. हे शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. होय ही घराणेशाही. हे शिवसैनिक वारसा हक्काने मिळाले आहेत. चोरून मिळाले नाही. मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही प्रचार केला. त्यावेळी आम्ही चोर नव्हतो. आज शिवसैनिक गुन्हेगार. रवींद्र वायकर गुन्हेगार, किशोरी ताई गुन्हेगार. सुरज गुन्हेगार असं उद्धव ठाकरे भाजपावर टीका करताना म्हणाले.