ठाकरे शैलीत उद्धव ठाकरे घेणार विरोधकांचा समाचार
| रायगड | आविष्कार देसाई |
लोकसभा निवडणुकीची तयारी विविध राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. नाशिकमध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा बिगुल वाजवला आहे. आता 1 फेब्रुवारी रोजी ते अलिबाग-चौल येथे सभा घेऊन शंखनाद करणार आहेत. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीन आमदारांनी गद्दारी करत ठाकरे सरकारला सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे. त्यांचाही खरपूस समाचार उद्धव ठाकरे या सभेत घेणार आहेत. ठाकरे हे भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे त्यांच्याबद्दल काय बोलणार, त्यांची कशी चिरफाड करणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या तंबूत घबराट पसरली आहे. कोकणात खऱ्या अर्थाने शिवसेना रुजली आणि वाढली. शिवसेना अडचणीत सापडली होती तेव्हा कोकणातील जनतेने नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. आजदेखील शिवसेनेला अंतर्गत कीड लागल्याने शिवसेना पोखरली जात असतानाच आता उद्धव ठाकरे हे कोकणातील जनतेला साथ देण्याचे आवाहन करण्यासाठी येत आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गटाची लढाई ही भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पावर गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात होणार आहे. लोकसभेसाठी ठाकरेंनी आधीच माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र, विरोधकांनी अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. सध्या रायगड लोकसभा अजित पवार गटाकडे आहे. त्यामुळे ते या जागेवर दावा सांगणार हे उघडच आहे. भाजपाने आधीच 400 उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली असल्याने तेदेखील रायगड लोकसभेवर हक्क सांगणार असल्याचे बोलले जाते. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात बसण्यासाठीचा रस्ता हा रायगड लोकसभेमार्फत जातो याची जाणीव असल्यानेच काहींनी लालबावटा खांद्यावरुन उतरवत कमळ हातात घेतले आहे. मात्र, त्यांना हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नाही. आधी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अडसर दूर करावा लागणार आहे. त्यानंतर भाजपाला ठाकरे गटाच्या उमेदवाराबरोबर दोन हात करावे लागणार आहेत. इंडिया आघाडीच्या माध्यमातून ठाकरे गटाचे हात मजबूत करण्याचे आधीच शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपा अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला विजय अजिबात सोपा नाही.
उद्धव ठाकरे यांच्या सहीचा एबी फॉर्म घेऊन जिल्ह्यातील तीन आमदारांनी 2019 साली निवडणूक लढवली आणि जिंकली होती. मात्र, पुढे त्यांनी शिंदेंसोबत जात ठाकरे यांची फसवणूक केली होती. अलिबाग-चौल येथील सभेत त्यांचीही चिरफाड ठाकरे करणार आहेत. त्यामुळे अलिबाग, महाड आणि कर्जतमधील आमदारांच्या तंबूत चलबिचल सुरु झाली आहे. दरम्यान, शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे हे आपल्या ठाकरे शैलीत राजकीय, सामाजिक विषयांवर परखड मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मोठ्या संख्येने नागरिक या सभेला येणार आहेत, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे यांनी कृषीवलशी बोलताना दिली.