प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठीही भरारी पथके
| रायगड । प्रतिनिधी ।
इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी, म्हणून यंदा बोर्डाने प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारीपासून तर लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 1 मार्चपासून सुरू होईल.
जिल्ह्यातील अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून 100 टक्के निकालासाठी परीक्षेवेळी भरारी पथकांचा अंदाज घेऊन वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगितली जातात ही वस्तुस्थिती आहे. अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची खात्री असलेल्या शाळांमध्येच प्रवेश घेतात अशीही स्थिती आहे. त्यासंदर्भातील तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच सरमिसळ पद्धत अवलंबण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यामुळे अनेक शाळांची चिंता वाढली आहे. पण, विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेची चिंता न करता, प्रश्नांचा सराव व नोट्स काढून त्याच्या अभ्यासावर भर दिल्यास परीक्षा सोपी जाईल, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. दहावी-बारावीतील गुण म्हणजे आयुष्य नव्हे, हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे. पालकांनीही अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादू नये. परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी पुरेशी झोप घेऊन पहाटेच्या सुमारास अभ्यास केल्यास तो लक्षात राहातो, असेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
ठळक बाबी…
इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 10 ते 29 फेब्रुवारीपर्यंत
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्चपर्यंत चालणार
दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 1 ते 26 मार्च या कालावधीत
यंदा सरमिसळ पद्धत अन् दहा मिनिटे जादा वेळ कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी सरमिसळ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत एकाच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षेसाठी असणार आहेत. पूर्वी एकाच शाळेतील विद्यार्थी एकामागे एक यायचे आणि त्यातून कॉपी करून किंवा एकमेकांचे पाहून उत्तरे लिहिली जायची. आता हा प्रकार बंद होईल. दुसरीकडे विद्यार्थ्यांना पेपर सुरू झाल्यावरच प्रश्नपत्रिका मिळेल, पण शेवटी 10 मिनिटांचा वेळ जादा दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहण्याचे बंधन असणार आहे.