आठ दिवस काम ठप्प
| आगरदांडा | प्रतिनिधी |
गेले आठ दिवस राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयांतील ऑनलाईन यंत्रणा ठप्प झाल्याने नागरिकांसह वाहनचालक व मालक त्रस्त झाले आहेत.
परवान्याचे काम करणार्या सारथीचे सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यात एकही परवाना काढता आला नाही. पेण आरटीओ कार्यालयामध्ये रोजच्या रोज शेकडो वाहने परवाने ऑनलाईन काढले जातात. परवान्याचे नूतनीकरण, परवान्यावरील पत्ता बदलणे, बनावट परवाना काढणे, वाहनांचा टॅक्स, नवीन गाड्या रजिस्ट्रेशन, नव्याने परवाने आदींसह परवाने काढण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक कार्यालयात ये-जा करीत असतात. शहरातील सायबर कॅफेमध्ये ही ऑनलाईन लायसन्स नूतनीकरण व नव्याने काढले जातात. परंतु, सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांना, वाहन चालकांना सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. यामुळे गेले आठ दिवसांत लायन्स नूतनीकरण करणार्या हजारो वाहनधारकांना फटका बसला आहे. कामकाज होत नसल्याने नागरिकांना निराश होऊन रिकाम्या हाताने परतावे लागत आहेत. तसेच आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
पेण आरटीओमध्ये वाहन परवाना काढण्यासाठी येणार्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही शिकाऊ परवाना काढणार्यांची संख्याही तेवढीच आहे. परंतु, गेले आठ दिवस आरटीओ अधिकारी बिघाड दूर करण्यास अपयशी ठरले आहेत.
परिवहन विभागामधून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र, त्या तुलनेत सुविधा मिळत नाहीत. परिवहन विभागाने सर्व्हरमध्ये तरी चांगली सुधारणा करुन नागरिकांसह चालकांना व मालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वच स्थरावर होत आहे.
महेश देवकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण
गेल्या 30 जानेवारीपासून सर्व्हरची समस्या निर्माण झाली आहे. काही कामे होतात, तर काही कामे होत नाही. नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर या कंपनीला कळविण्यात आले आहे. याबाबत कार्यालयाच्या बाहेर सूचना फलकदेखील लावण्यात आले आहे.