उचेडे येथील जय हनुमान संघ ठरला विजेता
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बेलकडे येथील ग्रामस्थ मंडळ व धावीर क्रीडा मंडळ आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धा शनिवार (दि.17) रोजी विद्युत प्रकाश झोतात घेण्यात आल्या. या स्पर्धेतील पेण तालुक्यातील उचेडे येथील जय हनुमान संघ अंतिम विजेता ठरला.
स्व. प्रभाकर पाटील क्रीडा संकुलामध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेख पाटील, अलिबागच्या माजी नगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, माजी सरकारी वकील ॲड. प्रसाद पाटील, सरपंच संजय पाटील, उपसरपंच प्रणिता पाटील, कृषीवलचे व्यवस्थापक रुपेश पाटील, महेंद्र पाटील, श्रीकांत पाटील, संतोष पाटील, मंगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ ग्रामस्थ, तरुण मंडळी, महिला वर्ग, खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण 48 संघांनी सहभाग घेतला होता. एकाच वेळी चार मैदानात सामने भरविण्यात आले होते. अंतिम सामन्यानंतर उचेडे येथील जय हनुमान संघाला रोख 21 हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. अलिबागमधील पांडबादेवी रायवाडी संघाला द्वीतीय क्रमांकाचे रोख 15 हजार रुपये व चषक, रोहा येथील जय बजरंग संघ आणि मुरुडमधील वादळ खारीकवाडा संघाला तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे प्रत्येकी रोख दहा हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले. तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून उचेडे संघातील जयेश गावंड, उत्कृष्ट चढाई म्हणून रायवाडी संघातील प्रशांत जाधव, पब्लिक हिरो म्हणून खारीकवाडा संघातील प्रितम कुमरोठकर आणि उत्कृष्ट पक्कड म्हणून उचेडे संघातील निशांत म्हात्रे या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन सन्मानित केले. शिस्तबध्द संघ पेणमधील जय भवानी वाशी संघ ठरला असून सरपंच संजय पाटील, कृषीवलचे व्यवस्थापक रुपेश पाटील व गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
खेळातून स्थानिक भूमीपूत्र घडले पाहिजे: चित्रलेखा पाटील क्रिडा क्षेत्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कायमच योगदान राहिले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या क्रीडा स्पर्धेला अधिक प्रोत्साहन देण्याचे काम शेकापच्या माध्यमातून झाले आहे. त्यासाठी लागणारे सहकार्य शेकाप मार्फत नेहमीच राहिले आहे. कबड्डी, क्रिकेट, ॲथलेटिक्स अथवा कोणत्याही खेळाचा प्रकार असू देत, मात्र त्याठिकाणी स्थानिक भूमीपूत्र पुढे गेला पाहिजे ही शेकापची कायमच इच्छा राहिली आहे. गोरगरीबांचे नेते, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील तथा भाऊ यांचे कबड्डीला प्रेम आणि योगदान प्रचंड होते. कबड्डी हा खेळ ऑलंपिक स्तरावर पोहचली पाहिजे ही, त्यांची इच्छा होती. कबड्डीच्या निमित्ताने आज बेलकडे गावात येण्याची संधी मिळाली. बेलकडे गावाने आपला एकोपा ठेवून गावातील गावपण टिकवून ठेवले आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी असतील, संजय पाटील व इतर मंडळी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी जो निर्णय घेतात तो खऱ्या अर्थाने कौतूकास्पद आहे. चांगले, प्रेमळ मनाची माणसे असणारे गाव म्हणजे बेलकडे गावाची ओळख आहे. गावातील पुढच्या पिढीनेदेखील गावपण टीकवून ठेवण्यासाठी ही परंपरा टीकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.