| अलिबाग | प्रतिनिधी |
स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यु. व्ही स्पोर्टस् ॲकेडमी आयोजित पीएनपी चषक 2024 या टेनिस क्रिकेट स्पर्धा 17 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आली असून पहिल्या दिवशी एकूण सहा सामने भरविण्यात आली. पहिल्या दिवशी क्रिकेटचा थरार रंगला. त्याचा आनंद प्रेक्षकांनी मनमुरादपणे घेतला. त्यामुळे क्रिडा रसिकांसाठी पीएनपी चषक आकर्षक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कुरुळ येथील आझाद मैदानात या स्पर्धेचा शुभारंभ शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात झाला. सुरुवातीला अलिबागमधील वकील आणि पत्रकार या संघामध्ये प्रदर्शनी सामना भरविण्यात आला. पत्रकार संघाने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. पत्रकार संघातील खेळाडूंनी चार षटकांमध्ये 19 धावा केल्या. वकील संघासमोर 24 चेंडूत 20 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. अवघ्या 3.1 षटकात वकील संघाने लक्ष गाठत विजय संपादन केला. यामध्ये वकील संघातील ॲड. समीर बंगाली सामनावीर ठरला. त्यानंतर पीएनपी चषकातील पहिला सामना साई कृपा साईनगर खंडाळे आणि ए.3 सोगाव या संघात झाला. सोगाव संघाने नाणे फेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. खंडाळे संघाने पाच षटकात 42 धावा केल्या. सोगाव संघाने अवघ्या 13चेंडूत या धावा करून विजय मिळविला. पराग राऊत याने चार चेंडूत 24 धावा केल्याने त्याला सामनावीर चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्ञानी इलेव्हन नांगरवाडी विरुध्द त्रिशाव्या इलेव्हन वरसोली या संघात लढत झाली. त्यामध्ये नांगरवाडी संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. तर वरसोली संघाने फलंदाजी करीत पाच षटकात चार बाद 65 धावा केल्या. नांगरवाडी संघाला जिंकण्यासाठी 66 धावांची आवश्यकता होती. या संघाने 4.5 षटकामध्ये लक्ष्य गाठत हा सामना जिंकला. नांगरवाडी संघातील किफायत पटेल याने 12 चेंडूत 29 धावा केल्याने त्याला सामनावीरचा चषक देऊन गौरविण्यात आले. ए3 सोगाव आणि ज्ञानी इलेव्हन नांगरवाडी या संघामध्ये सामना भरविण्यात आला. त्यामध्ये सोगाव संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. नांगरवाडी संघाने फलंदाजी स्विकारून पाच षटकात चार बाद, 67 धावा केल्या. सोगाव संघाने 4.4 षटकात धावा पूर्ण करून विजय मिळविला. या स्पर्धेत हर्षल पाटील यांनी पाच चेंडूत 13, ऋषीकेत राऊत यांनी दहा चेंडूत 23 धावा केल्या. तर ऋतिक माळी यांनी पाच चेंडूत 20 धावा केल्याने माळी यांना सामनावीरचा चषक देण्यात आला.
साईकृपा साईनगर खंडाळे आणि त्रिशाव्या इलेव्हन वरसोली संघामध्ये सामना झाला. वरसोली संघाने नाणे फेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. खंडाळे संघाने फलंदाजी करीत 9 बाद 35 धावा केल्या. वरसोली संघासमोर विजयासाठी 36 धावांचे लक्ष्य होते. अवघ्या 2.3 षटकामध्ये वरसोली संघाने लक्ष्य गाठत विजय मिळविला. सलमान सिध्दी याने सहा चेंडूत 17, सचिन म्हात्रे याने आठ चेंडूत 19 धावा केल्या. सलमान सिद्दीक याने 17 रनांबरोबरच चार विकेट घेतले. त्यामुळे त्यांना सामनावीरचा चषक देऊन सन्मानित करण्यात आले. ज्ञानी इलेव्हन नांगरवाडी आणि त्रिशाव्या 11 वरसोली या संघामध्ये झालेल्या सामन्यात वरसोली संंघाने पाच षटकामध्ये 9 बाद 38 धावा केल्या. नांगरवाडी संघासमोर 39 धावांचे लक्ष्य होते. या संघातील खेळाडूंनी 2.1 षटकात लक्ष्य पूर्ण करून नांगरवाडी संघाला विजय मिळवून दिला. नांगरवाडी संघातील भुषण झावरे या खेळाडूने एक षटकात तीन खेळाडू बाद करून निरधाव षटक पुर्ण केले. त्यामुळे या खेळाडूला सामनावीरचा चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
दुसऱ्या दिवसातील खेळाला सुरुवात
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आझाद मैदानात 17 फेब्रुवारीपासून पीएनपी चषक 2024 या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. रविवारी दुसऱ्या दिवशी दुुपारी एक वाजल्यापासून खेळाला सुरुवात झाली. कावाडे येथील आदिरा वॉरिअर्स आणि वरसोली येथील सुरेश काका 11 संघामध्ये दुसऱ्या दिवसातील पहिला सामना भरविण्यात आला. त्यात सुरेश काका 11वरसोली संघाने विजय मिळविला.
रायगड जिल्हा परिषद माजी सदस्या प्रियदर्शनी पाटील, ठाकरे गटातील शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, फिडी कठोर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, शिवसेनेचे सतिश पाटील, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, धर्मा घारबट, मधुकर ढेबे, निलेश वारगे, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, संजय माळी आदी मान्यवर पदाधिकारी, खेळाडू उपस्थित होते.
आदिरा वॉरिअर्स संघाने सुरुवातीला फलंदाजी स्विकारली. या संघाने पाच षटकात 51 धावा केल्या. सुरेश काका 11 संघासमोर विजयासाठी 52 धावांचे लक्ष होते. या संघातील खेळाडून दमदार कामगिरी बजावत 3.5 षटकात लक्ष्य पूर्ण करून विजय संपादन केला. या संघातील खेळाडू शिरू याला सामनावीर चषक देऊन गौरविण्यात आले. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.