| मुंबई | प्रतिनिधी |
शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या ‘अटल सेतू वरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर उद्या (दि. २०) फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन-मंत्रालय सकाळी 6.30 व स्वारगेट- दादर 7.00 या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत. या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचली. परत 11 वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय व दादर येथून निघतील. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे १ तास वाचणार आहे. तिकीट दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरी प्रवाशांनी शिवनेरी बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या बस फेऱ्या अर्थात, एसटीच्या अधिकृत ॲप वर व www.msrtc.gov.in संकेतस्थळावर आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
तिकीट दरात कोणताही बदल नाही शिवडी- नाव्हाशेवा अटल सेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांकडून 250 रुपये इतका टोल आकारला जातो. त्यामुळे या मार्गावरुन धावणाऱ्या शिवनेरी बसचे तिकीट वाढणार का, हा प्रश्न होता. परंतु, एसटी महामंडळाने अटल सेतूवरुन धावणाऱ्या शिवनेरी बसेससाठी तिकीट दरात कोणताही बदल केलेला नाही.
प्रवासाचा वेळ तासाभराने कमी अटल सेतूवरुन मुंबईतून निघालेली बस अवघ्या २० मिनिटांत सिग्नलमुक्त मार्गाने चिर्ले येथे पोहोचणे शक्य होणार आहे. चिर्लेहून 60 किमी अंतरावर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आहे. अटल सेतूच्या मार्गाने पुणे ते दादर हे अंतर वाशी, कळंबोली मार्गापेक्षा पाच किलोमीटरने कमी भरते. याशिवाय, वाहतूक कोंडीची समस्या विचारात घेतल्यास शिवनेरी बस अटल सेतूवरुन नेल्यास प्रवासाचा वेळ साधारण तासाभराने कमी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा अनुभव आता आणखी सुखकारक होणार आहे.