| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. अजित पवार हयात असते, तर 12 फेब्रुवारी रोजीच राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले असते, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. अजितदादांनी आपल्याला विलिनीकरणाबाबत पूर्वकल्पना दिली होती, असे सांगतानाच छगन भुजबळ यांनी केलेला विलिनीकरणाच्या बैठकांचा दावा खरा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तटकरेंच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे.
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती, असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता. त्यावर तटकरेंनी शिक्कामोर्तब केले. भुजबळ यांच्यावर एशियन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्याआधीच अजितदादा आणि जयंत पाटील यांची भेट झाली होती. विलिनीकरणाची बैठकही झाली होती. भुजबळ यांनी रुग्णालयातूनच या चर्चेत सहभाग घेतला असावा. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यात तथ्य आहे, असे तटकरे म्हणाले.
योग्यवेळी आणखी बोलणार
अजित पवार यांच्या निधनानंतर आपण विलिनीकरणाबाबत का बोललो नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, कोणत्या वेळी काय बोलायचे, याची मला समज आहे. मी तेव्हा बोललो नाही, आता बोलत आहे, यात काहीही तथ्य नाही. योग्यवेळी आणखी बोलेन, असे सूचक विधान तटकरे यांनी केले.
उदय सामंतांना सुनावले
शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केलेल्या टीकेलाही तटकरेंनी प्रत्युत्तर दिले. उदय सामंत हे राष्ट्रवादीतील माझे एकेकाळचे सहकारी आहेत. मी काय बोलावे आणि काय बोलू नये, हे त्यांनी सांगण्याची गरज नाही. आमचे पक्ष वेगळे आहेत. आम्ही त्यांच्या पक्षाबाबत बोलत नाही. लोकशाही आघाडी सरकारमध्ये सामंत यांना मंत्री करण्यात आमचाही थोडाफार वाटा होता. नसेल तर त्यांनी सांगावे, असा टोला तटकरेंनी लगावला






