स्थानिक आर्किटेक्चर, पर्माकल्चर शेतीच्या अभ्यासाठी उद्धर येथे दाखल
। पाली/वाघोशी । प्रतिनिधी ।
कृषी पर्यटन आणि शाश्वत शेतीची थेट युरोपमधील तरुणाईला भुरळ घातली आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील उद्धर येथे जर्मनीहून आलेले फ्रेडमन आणि रशियाची ऍना हे दोन तरुण पर्यटक येथील स्थानिक आर्किटेक्चर, पर्माकल्चर शेती व ग्रामीण संस्कृतीच्या अभ्यासाठी आले आहेत.
जागतिक स्तरावर पर्माकल्चर (शाश्वत आणि नैसर्गिक शेती) बाबत जनजागृती वाढत असताना, हे परदेशी तरुण भारताच्या पारंपरिक शेती पद्धतीचा अनुभव घेत आहेत. उद्धर येथील ‘आत्मतृप्ती पर्माकल्चर’चे संचालक तुषार केळकर यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून ते येथे पर्यटन व अभ्यास दौऱ्यावर आले आहेत. प्रत्यक्ष मातीत काम करण्याचा व ग्रामीण भागात राहण्याचा अनुभव त्यांना घ्यायचा होता. फ्रेडमन आणि ऍना महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे आणि खाद्यपदार्थांचेही चाहते झाले आहेत. ग्रामीण पद्धतीचे जेवण आणि आदरातिथ्याने त्यांना भुरळ घातली आहे.
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार कसा होऊ शकतो, याचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. या परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे स्थानिक तरुणांनाही शेतीकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला आहे. सात दिवस हे दोघे फार्मवर राहून पर्माकल्चरच्या इतर विविध संकल्पना आणि ग्रामस्थांसोबत वेळ घालवून भारतीय संस्कृतीचा तसेच स्थानिक आर्किटेक्चर, पर्माकल्चर शेतीचा सखोल अभ्यास करत आहेत. अगदी रांगोळी काढणे, स्वयंपाक करणे, शेतातील कामे करणे, भातशेती कापणे, गवत काढणे ही सर्व कामे देखील हे तरुण करत आहेत.






