पर्यावरणस्नेही उत्सवाकडे भक्तांचा कल
बाप्पाच्या आराशीसाठी शोभिवंत झाडे, फूलझाडांची खरेदी
पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
गणेशोत्सव पर्यावरणाला पोषक ठरावा यासाठी सजावटीसाठी आता थर्माकोल, प्लास्टिक आदी साहित्यांव्यतिरिक्त नैसर्गिक व विघटनशील अशा साधनांच्या वापरावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी शोभिवंत झाडे, फुलझाडे आणि कुंड्यांची मोठी खरेदी भक्तांकडून झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या शोभिवंत झाडांच्या किंमतीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पर्यावरण संवर्धनाबरोबरच या झाडांमुळे सुंदरता व आकर्षकपणादेखील येतो. शिवाय, ही झाडे नंतर परसबागेची शोभादेखील वाढवितात. पेण येथील सुहास पाटील यांनी सांगितले, की गेली अनेक वर्षे इकोफ्रेंडली आरास बनवितो. त्यामध्ये आकर्षक फुले व शोभिवंत झाडांचा वापर करतो. त्यामुळे पर्यावरण संवर्धनदेखील होते आणि सुंदर आरासदेखील बनते. यावर झाडांवर काहीजण रोषणाईदेखील करतात. अतिशय कमी वेळेत पर्यावरणस्नेही आकर्षक आरास बनून तयार होते.
सध्या अनेक नर्सरी चालकांनी अशा स्वरूपाची शोभिवंत व फुलझाडे आणि विविध आकाराच्या व रंगाच्या कुंड्यादेखील आपल्या नर्सरीमध्ये विकण्यास ठेवल्या आहेत. तसेच गणेशोत्सवासाठी विशेष सूट व आकर्षक योजनादेखील दिल्या आहेत. त्यामुळे पर्यावरण पूरक कापडी, कागदी व पुठ्याच्या मखरांबरोबरच आता शोभिवंत आणि फूलझाडेदेखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी योगदान देत आहेत.
पर्यावरणाचे भान राखून कोणतेही सण व उत्सव साजरे केले पाहिजेत. त्यामुळेच नर्सरीत माफक दरात शोभिवंत झाडे व फुलझाडे तसेच कुंड्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. याबरोबरच या सर्वांची मांडणी व रचना कशी करावी याची माहिती व कल्पना मोफत देत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास थोडा हातभारदेखील लागत आहे. कोरोना आणि गाडीभाडे वाढल्याने यंदा झाडांच्या किंमती वाढल्या आहेत.
अमित निंबाळकर, मालक, ग्रीनटच नर्सरी, पाली
या झाडांना मागणी
शोभिवंत झाडांमध्ये अरेका पाम, स्पायकस, मयूर पंखी, सायप्रस, झिपरी, ट्रेसीना व ख्रिसमस ट्री आदी शोभिवंत झाडांना मागणी असते. फुलांमध्ये जलबेरा व लिलीची फुले अधिक चालतात, कारण ती लवकर खराब होत नाहीत.







