। औरंगाबाद । प्रतिनिधी ।
राज्यसभेसाठी होणार्या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकमेव जागेवरून उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरु आहे.6 ऑक्टोबरला ही निवडणूक होत आहे.राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.
या जागेवर राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव सर्वाधिक प्रबळ उमेदवार मानल्या जात आहेत. मात्र, राज्यसभेच्या या जागेवर आपल्याला संधी मिळावी यासाठी मुकूल वासनिक, अविनाश पांडे, मिलिंद देवरा, संजय निरुपम यांच्याकडूनही राज्यसभेच्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरु आहे. त्यामुळे आता हायकमांड कोणाच्या पारड्यात दान टाकणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.
प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवावे की विधानसभेची उमेदवारी द्यावी, याविषयी वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्याप चर्चा सुरु आहे. त्यांनाा 2024च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाह देखील पुढे आला आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.