| पाली/बेणसे | वार्ताहर |
पश्चिम घाटाचा विस्तिर्ण पट्टा, विपुल जैवविविधता व डोंगरदऱ्यांनी वेढलेला आणि एैतिहासिक वारशांचा ठेवा म्हणून रायगड जिल्हा ओळखला जातो. मात्र येथे वारंवार लागणाऱ्या वणव्यामुळे जैवविविधता, वनसंपदा व पशू-पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवाय मालमत्ता देखील नष्ट होते. पाली खोपोली राज्य महामार्गावर दापोडे गावाजवळील मांढरे पेट्रोल पंपासमोर भंगार व जुन्या लाकडाच्या गोदामाला मंगळवारी (दि.20) दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली होती. ही आग वणव्यामुळे लागली होती. या आगीत दोन्ही गोदामातील सामान व गोदामाबाहेर उभी असलेली तीनचाकी जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर पालीतील सरसगड किल्ल्यावर बुधवारी (दि.21) मोठा वणवा लागला होता. या वणव्यामुळे किल्ल्याचा बहुतांश भाग जळून होरपळला. यामध्ये किल्ल्यावर नव्याने लावलेले रोपे व संवर्धन केलेली झाडे जळाली आहेत. हा वणवा वनक्षेत्रपाल विकास तरसे व वनपाल यांच्या आदेशाने वनरक्षक विनोद चव्हाण, वनरक्षक संकेत गायकवाड, वनमजुर पांडुरंग पवार, गोविंद लांगी, नामदेव पुंजारे आदि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून विझवला. त्यामुळे मोठे नुकसान टळले. तसेच वणवा मानवी वस्तीत पोहचला नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
मागील वर्षापूर्वी माणगाव तालुक्यातील विळे भागाड एमआयडीसी भागातील डोंगरावर व माळरानावर प्रचंड मोठा वणवा लागला होता. येथील स्थानिक पर्यावरण व निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी या भागाची पाहणी केली असता या वनव्यामध्ये ठिपकेवाली मुनिया आणि इतर पक्षांची घरटी पूर्णपणे जळून गेली आहेत. शिवाय पूर्ण विकसित झालेली अंडी देखील जळाली आहेत. पक्षांचा अधिवास व खाद्य देखील नष्ट झाले आहे. अशाच प्रकारचे वणवे ठिकठिकाणी लागणे सुरू झाले आहे.
जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांवरील हे वणवे या ऐतिहासिक वस्तूंना देखील नुकसान पोहचवत आहेत. सध्या अशा वणव्यांना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. गवत जळल्याने गवतावर अवलंबुन असणाऱ्या गुरे-ढोरांवर उपासमारीची वेळ येते. मोठ्या प्रमाणात सजीव सृष्टीचे नुकसान होते. या वणव्यांवर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, संबधीत विभागाने व नागरिकांनी हि बाब गंभीरतेने घेवून तत्काळ उपायोजना करणे आवश्यक आहे.
बहुतांश वणवे हे मानवनिर्मित असतात. नोव्हेंबर अखेरपासून व मार्च नंतर पानगळ सुरू झाल्यावर जिल्ह्यात वणवे लागतात. यावेळी पक्षांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे पक्षी, त्यांचा अधिवास, त्यांची पिल्ले आणि अंडी नष्ट होतात. तसेच, वणव्यामुळे महत्वाची जैवविविधता धोक्यात येते. वणव्यांमुळे जमिनीवरील गवत, झुडुपे जळून जातात. वणवे रोखण्यासाठी वन विभागाकडून जनजागृती व प्रबोधन केले जाते. अत्याधुनिक फायर ब्लोअर द्वारे वणवे विझविले जातात. जळरेषा काढली जाते.
समीर शिंदे, वनक्षेत्रपाल,
कांदळवन, अलिबाग
सजीव सृष्टीला धोका नैसर्गिक व कृत्रिम वणव्यांमुळे सजीव सृष्टी धोक्यात येते. पर्यावरणाची प्रचंड हानी होते. प्रदुषण वाढते. येथील महत्वपूर्ण जैवविविधता संपुष्टात येते. सरटणारे जीव, किटक आणि झाडे-झुडपे, औषधी वनस्पती आगीमध्ये भस्मसात होतात. विवीध प्राण्यांचे व पक्षांचे आसरे-निवारे संपुष्टात येतात. त्यांची पिल्ले देखिल या आगीत होरपळून मरतात. तसेच पक्षांचे आणि गुरे-ढोरांचे अन्न नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींना देखिल या आगीमुळे धोका संभवतो.
ऐतिहासिक वास्तू व किल्यांचे नुकसान वणव्यांमुळे जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे गड-किल्ल्यांचे व ऐतिहासिक ठेव्यांचे बांधकाम कमकुवत होवुन ते ढासळण्याची भिती असते. किल्याच्या तटबंदीवर, बरुजांवर उगवलेले गवत जळाल्यामुळे त्यांचे नुकसान होते. वणवे लागल्यामूळे किल्ले व ऐतिहासिक वास्तूंवरील मोठ्या प्रमाणात वनसंपदा देखील नष्ट होत आहे. परिणामी या ठिकाणी वणवे लागणार नाहीत याची दक्षता व खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे.
ठोस उपाययोजनांची गरज कृत्रिम वणव्यांमुळे संपुर्ण सजिवसृष्टी धोक्यात येते. पर्यावरणाचा-हास होतो. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विविध उपाय व जनजागृती केली जाते. तसेच, काही वेळेला विद्यार्थी पथनाट्य सादर करतात. मात्र, हे प्रयत्न अपुरे आहेत. या उपयांबरोबरच स्थानिक लोकांना व आदिवासींना वणव्याचे दुष्परिणाम सांगून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. यासाठी गाव समिती निर्माण केली पाहिजे. प्रामुख्याने वनविभाग, निसर्गप्रेमी व आदिवासी विदयार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्याची गरज आहे. लोकांनी देखील स्वयंस्फूर्तीने वणवे रोखणे व स्वतः लावणार नाही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. याबाबत शाळा स्थरावर व वनविभागाच्या माध्यमातून प्रबोधन व जनजागृती करत असल्याचे विळे येथील शिक्षक राम मुंडे यांनी सांगितले.