| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड जंजिरा सार्वजनिक वाचनालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद, मुरुड जंजिरा शाखा यांच्या संयुक्त विद्यामाने मराठी भाषा गौरव दिन व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुरुड वाचनालयात ‘जागर माय मराठीचा’ हा शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी साहित्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन तसेच, कुसुमाग्रज व स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाच्या सांस्कृतिक समिती अध्यक्षा दीपाली जोशी, कोमसाप मुरुड शाखा अध्यक्ष संजय गुंजाळ, युवाशक्ती जिल्हा प्रमुख सिद्धेश लखमदे, उपाध्यक्षा उषा खोत, वाचनालयाचे कार्यवाह विनय मथुरे, अच्युत चव्हाण, ग्रंथपाल उत्कर्षा गुंजाळ, पुस्तक निवड समिती सदस्य शकील कडू, कोमसाप सदस्या उर्मिला नामजोशी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दीपाली जोशी यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची सखोल ओळख करून दिली, तसेच मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यानंतर मुरुडमधील विविध शाळांमधून आलेल्या 30 विद्यार्थ्यांनी मराठी कविता, कथा, अभिवाचन, गीतगायन करून वातावरण साहित्यिक केले. कोमसाप आणि वाचनालयातर्फे सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गौरवण्यात आले. संजय गुंजाळ यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी वाचन आणि सादरीकरणासाठी चांगल्या साहित्याची निवड करावी, असे आवाहन केले. मराठी भाषेचे महत्त्वदेखील श्री. गुंजाळ यांनी विशद करून उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता पेंडसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वप्नील भायदे यांनी मेहनत घेतली.