| हैदराबाद | वृत्तसंस्था |
मदार होती अस्लम इनामदारवर, पण हुकमाचा पत्ता ठरला तो पंकज मोहिते. एकाच चढाईत चार गुण मिळवून कलाटणी देणार्या पंकजच्या शानदार खेळाच्या जोरावर पुणेरी पलटणने हरियाणाचा 28-25 असा पराभव केला आणि प्रो कबड्डीत पहिलेवहिले अजिंक्यपद मिळवले. गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या पुण्याच्या संघाने यावेळी थाटात विजेतेपदाला गवसणी घातली. साखळी स्पर्धेत 22 पैकी 17 विजय मिळवणारा पुण्याचा संघ अव्वल होता आणि अव्वलच राहिला.
मध्यांतराच्या काही क्षण अटीतटीचा सामना असताना पंकजने एकाच चढाईत चार गुण मिळवले, त्यानंतर प्रत्येक वेळी निर्णायक चढाईतही गुण मिळवत त्याने आपल्या संघाला आघाडीवर ठेवले. पंकजने एकूण 10 गुण मिळवले. मोहित गोयतने पाच, तर संघाला पकड मिळाल्यानंतर वर्चस्व ठेवणार्या अस्लमने चार गुणांची कमाई केली. कोपरारक्षक गौरव खत्री आणि मोह्ममद्रेझा यांचाही खेळ मोलाचा ठरला.
नाट्यमय क्षण
पहिले अर्ध संपायला दीड मिनीट शिल्लक असताना मोठे नाट्य घडले. पुण्याकडे 9-7 अशी आघाडी होती; पण पंकज चढाईला आला ती चढाई डू ऑर डॉयची होती. त्याने या चढाईत चार गुणांची सुपर चढाई केली आणि लगेचच गुणफलक 13-9 असा झाला. पुण्याचा आवश्यक असलेली पकड मिळाली खरी; पण त्यांना ती कायम राखता आली नाही. हरियाणाकडे विशाल ताटे हा एकच खेळाडू होता. त्याला बाद करून लोण देण्याची संधी पुण्याला होती; परंतु त्याने बोनस गुण मिळवत आणि एक गुणही मिळवला. मध्यांतरला गुणफलक 13-10 असा झाला.
हरियाणावर बोनस देण्याची हुकलेली संधी पुण्याने उत्तरार्धात चौथ्या मिनिटाला साधली. त्यानंतर पंकजने निर्णायक चढाईत गुण मिळवला आणि संघाला 20-13 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुण्याने मागे वळून पाहिले नाही. सामना संपायला काही वेळ असताना हरियाणाने सिद्धार्थ देसाईला मैदानावर उतरवले, त्यानंतर झटापटीत गुण मिळवले; परंतु सामन्याचा निकाल तो बदलू शकला नाही.