| नागोठणे | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील टेमघर-चणेरा येथील प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी अनंत दत्तात्रेय भोईर यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याकरीता शासनाचा कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा असलेला सन 2022 चा कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत तसेच, नवनवीन प्रयोग करीत एक प्रगत शेतकरी म्हणून इतर शेतक-यांसमोर आदर्श निर्माण केल्याबद्दल हा सन्मान करण्यात येत असल्याचे अनंत भोईर यांना शासनाकडून देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.
अनंत भोईर यांनी शेतीविषयक केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी याआधीही विविध पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, 2008-09, रोहा तालुका भातपीक स्पर्धा 2020-21 मध्ये प्रथम क्रमांक, रोहा तालुका माती भातपीक स्पर्धा, 2022-23 मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. कृषी क्षेत्रातील अनंत भोईर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत वागळे इस्टेट, ठाणे येथील शासनाच्या कृषी भवन इमारतीमधील कोकण विभागीय कृषी कार्यालयातील विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांच्या सहीचे पत्र अनंत भोईर यांना पाठवून पुरस्काराबाबत कळविण्यात आल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, हा पुरस्कार मिळण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कृषीअधिक्षक कार्यालय, रोहा तालुका कृषी विभाग तसेच, आत्मा विभाग यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे पुरस्कार विजेते अनंत भोईर यांनी सांगितले.







