क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती
| लातुर | वृत्तसंस्था |
येथील तालुका क्रीडा संकुलावर (दि.8) ते (दि.12) मार्च दरम्यान स्व. खाशाबा जाधव यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील आठ क्रीडा विभागातील कुस्तीपटू उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी (दि.3) येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी मंचावर तहसीलदार राम बोरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुर्यकांत लकडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष अस्लम काझी, शहर पोलीस निरिक्षक करण सोनकवडे, ग्रामीणचे अरविंद पवार, तालुका क्रीडाधिकारी चंद्रकांत लोदगेकर आदी मान्यवर उपस्थित होत.
यावेळी क्रीडामंत्री बनसोडे म्हणाले की राज्यची क्रीडा संस्कृतीची जोपासना व वाढ होण्यासाठी विविध खेळाच्या माध्यमातून युवा पिढीला खेळाकडे आकर्षीत करणे व त्यांच्या मधील क्रीडा गुणांना वाव देणे आवश्यक आहे. कुस्ती हा खेळ महाराष्ट्रात सर्वत्र खेळला जातो. देशातील इतर राज्यात व देशाबाहेर कुस्ती खेळाचा प्रचार व प्रसार करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेचे आयोजन सीमा भागातील उदगीर सारख्या शहरात होत आहे. उदगीर शहरात यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय युवा महोत्सव, राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा यासारखे इतर मोठे कार्यक्रम पार पडले आहेत. त्याच धर्तीवर 8 ते 12 मार्चच्या दरम्यान उदगीर शहरात राज्यस्तरीय स्व.खाशाबा जाधव राज्यस्तरीय चषक स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेत राज्यातील एकूण 360 खेळाडू व संघ व्यवस्थापक सहभागी होणार आहेत. यामध्ये 10 फ्री स्टाईल, 10 ग्रीको रोमन व मुलींचे 10 संघ, असे एकूण 30 संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघात 10 वजनी गटातील 10 खेळाडू तसेच संघासोबत 1 संघ व्यवस्थापक व 1 मार्गदर्शक असा 12 जणांचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना रोख प्रथम क्रमांकाचे 60 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाचे 50 हजार रुपये व तृतीय क्रमांकाचे 30 हजार रुपये याप्रमाणे एकूण 35 लाख 25 हजार रुपयांचे पारितोषक प्रत्येक गटास देण्यात येणार आहे. यासोबत या स्पर्धेमध्ये अर्जुन पुरस्कारार्थी व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार यासारख्या राज्य व राष्ट्रीय पुरस्कारर्थीचा सन्मान करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन 9 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता तालुका क्रीडा संकुल मैदानावर होणार आहे.तरी या भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी व कुस्ती प्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.
स्पर्धेचे भव्यदिव्य उद्घाटन या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन (दि.9) मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता तालुका क्रीडा संकुलावर होणार असून यावेळी भव्य लेजर शो, फटाक्याची आतषबाजी यासह अनेक वेगळे उपक्रम राबवून भव्य दिव्य उद्घाटन करण्यात येणार आहे. शिवाय खेळाडूंच्या पालकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे यावेळी क्रीडामंत्री बनसोडे यांनी सांगितले.