| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्ली कॅपिटल्सनं महिला प्रीमियर लीग 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवलाय. रविवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अवघ्या 1 धावेनं पराभव केला. जेमिमाह रॉड्रिग्जनं शानदार फलंदाजी करत दिल्लीसाठी अर्धशतक झळकावलं. तिनं 36 चेंडूत 58 धावा केल्या. एलिस कॅप्सीनंही 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसंच गोलंदाजीत कॅप्सीनंही एक विकेटही घेतली. आरसीबीकडून रिचा घोषनं अर्धशतक झळकावलं. मात्र, ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलनं 4 बळी घेतले.
दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरलाय. यासह ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. मुंबई इंडियन्सनं याआधीच प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीनं 7 सामने खेळले असून 5 जिंकले आहेत. त्यांचे 10 गुण आहेत. नेट रन रेटच्या बाबतीत दिल्ली मुंबईच्या पुढं आहे. त्यामुळं दोन्ही संघांचे प्रत्येकी 10 गुण असूनही दिल्ली अव्वल स्थानावर आहे.







