| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट संघाच्या विश्वविजेतेपदात मोलाचा वाटा उचलणारे मानसोपचारतज्ज्ञ पॅडी अपटन यांचे मार्गदर्शन आता भारताच्या पुरुष हॉकी संघाला लाभणार आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये दक्षिण आफ्रिकेचे पॅडी अपटन यांच्या मार्गदर्शनात भारतीय पुरुष हॉकी संघ मैदानात उतरणार आहे. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. हॉकी इंडियाकडून याबाबतची घोषणा बुधवारी (दि.13) करण्यात आली. भारतीय क्रिकेट संघाने 2011मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक पटकावला. त्यावेळी पॅडी अपटन हेच भारतीय क्रिकेट संघाचे मानसोपचारतज्ज्ञ होते.
भारतीय पुरुष हॉकी संघाने मागील काही काळात आशियाई चॅम्पियन्स करंडक व आशियाई क्रीडा स्पर्धा या दोन महत्त्वाच्या स्पर्धा सुवर्णपदक पटकावले. या दोन्ही स्पर्धांच्या कालावधीत पॅडी अपटन हे संघाचे मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन याप्रसंगी म्हणाले, आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी पॅडी अपटन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पॅरिस ऑलिंपिकसाठीही ते संघासोबत कायम राहणार आहेत.
चौथ्या स्थानी घसरण भारतीय पुरुष हॉकी संघाची जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेकडून नवी क्रमवारी जाहीर करण्यात आली. नेदरलँडस्चा संघ पहिल्या स्थानावर विराजमान असून बेल्जियमचा संघ दुसर्या स्थानावर आहे. दरम्यान, भारतीय महिला हॉकी संघ नवव्या स्थानावर पोहोचला आहे. पॅरिस ऑलिंपिक पात्र ठरण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय महिला हॉकी संघाची क्रमवारीतही निराशा झाली आहे. महिला विभागातही नेदरलँडस्चे वर्चस्व दिसून येत आहे. त्यांचा संघ पहिल्या स्थानावर आहे.
खेळात सुधारणा करावी लागणार भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. पॅरिस ऑलिंपिकला अजून तीन ते चार महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी आमच्याकडे अवधी आहे. अव्वल तीन देशांना ऑलिंपिकमध्ये पदक मिळणार आहे. क्रमवारीवर लक्ष देता भारताला पदक मिळण्याची शक्यता नाही; पण हॉकी या खेळाची हीच विशेषता आहे. भारतीय संघ सुधारणा करण्यावर भर देत असून प्रत्येक स्थानासाठी खेळाडू तयार करण्यात येणार आहे. ऑलिंपिकमध्ये दबावाखाली खेळ उंचावण्यासाठी पाऊल उचलण्यात येईल, असे क्रेग फुल्टन स्पष्ट म्हणाले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची मालिका भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 2 ते 15 एप्रिल या दरम्यान पाच सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मालिकेसाठी आम्ही कसून सराव करीत आहोत. बचाव आणखी भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. भारतीय संघात मोठ्या प्रमाणात बदल करायचे नाहीत, असे क्रेग फुल्टन आवर्जून सांगतात.