45 विद्यार्थी आणि शिक्षक सुखरूप
। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज खामगाव-बुलढाणा ही बस रायगडकडे जात असताना तिचा शिळफाटा मिळगावजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बस मधील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, 45 विद्यार्थी आणि शिक्षक सुखरूप बचावले आहेत.
अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज खामगाव यांची सहल घेऊन खासगी बस चिखली ते रायगडकडे जात होती. मुंबई-पुणे महामार्गाने खोपोली एक्झिटवरून शिळफाटाकडे जात असताना मिळगाव जवळील तीव्र उतारावर अचानक बसचा ब्रेक फेल झाला. बस रस्त्याच्या बाजूला 100 मीटर खाली जाऊन मोठ्या दगडाला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील राहुल साहेबराव सूरूशे (30) कोल्हारा चिखली-बुलडाणा याचा बसच्या केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. तर, अन्य बसमधील 45 विद्यार्थांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही.
या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस आणि अपघात ग्रस्त टीमचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बसमधील असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना तात्काळ बाहेर काढून त्यांना गगनगिरी आश्रम मठ येथे राहण्याची सोय करण्यात आली आहे.