। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील कायरा घरतने कराटे स्पर्धेत ‘ब्लू बेल्ट’ मिळविला. चौल शितलादेवी येथील कायरा अक्षय चेंढरे येथील सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूलमधील विद्यार्थीनी असून इयत्ता दुसरीमध्ये ती शिकत आहे. वयाच्या पाच वर्षापासून ती कराटेचे धडे घेत आहे. तसेच, प्रशिक्षक राहूल तावडे यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे कराटे स्पर्धेतून कायरा हीने तीन वर्षात आठहून अधिक बक्षीसे मिळविली आहे. नुकतीच अलिबागमध्ये जपान शितोकाई कराटे स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये कायरा घरत हीने उत्तम कामगिरी करीत ब्लू बेल्ट पटकाविला. भविष्यात ब्लॅक बेल्ट मिळविण्याचे तिचे स्वप्न असून त्यासाठी अथक परिश्रम घेणार असल्याचे तिने सांगितले. तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.