| सुधागड-पाली | वार्ताहर |
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ‘होळी करु लहान, पोळी करु दान’ असे आवाहन महाराष्ट्र अंनिसने केले होते. त्यानुसार पालीतील तरुण व सुज्ञ नागरिक तसेच महा. अंनिस पाली-सुधागड शाखेचे पदाधिकारी यांनी रविवारी (दि.24) रात्री नगरपंचायत हद्दीतील होळ्यांवरून जवळपास सहाशेहुन अधिक पोळ्या संकलित केल्या. आणि सोमवारी (दि.25) या पोळ्या आदिवासी वाड्या-पाड्यांवर वाटून आदिवासी व गरिबांची होळी गोड करण्यात आली. यंदाही लोकांनी या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.
‘होळी लहान करू या, पोळी दान करू या’ या कार्यक्रमाच्या पाठीमागे सुद्धा राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान टाळणे व पर्यावरणाचे प्रदूषण थांबवणे हा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी हा उपक्रम राबिवला गेला. पालीतील विविध ठिकाणच्या नागरिकांनी आधीच खोक्यांमध्ये योग्य प्रकारे पोळ्या भरून ठेवल्या होत्या. या पोळ्या बुरुडआळी येथील श्री बापूजी मंदिरात जमा करण्यात आल्या. महा. अंनिस सुधागड-पाली शाखेचे कार्याध्यक्ष अमित निंबाळकर व पदाधिकारी रोशन रुईकर यांनी रविवारी (दि.24) होळीच्या रात्री पालीतील सर्व होळ्यांवर जावून पोळ्या जमा करण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वाटल्या. त्यामध्ये व खोक्यात लोकांनी व्यवस्थितरीत्या पोळ्या संकलित करून ठेवल्या.
ठिकठिकाणी लोकांनी उत्स्फुर्तपणे स्वतःहून पुढे येऊन पोळ्या आणून दिल्या. त्यामुळे होळीत जाणार्या शेकडो पोळ्या गरिबांच्या मुखी लागल्या. पालीतील सर्व आळ्यांमधील तसेच झाप, बुरमाळी या गावांमधील होळ्यांवरुन पोळ्या दान करण्यात आल्या. अंनिस कार्यकर्ते व नागरिकांनी सुधागड तालुक्यातील दापोडे व तळई या आदिवासीवाडी आणि टेंबी वसाहतीमध्ये या पोळ्यावाटून आदिवासी अबाल-वृद्धांचे तोंड गोड केले. यावेळी पाली अंनिस शाखेचे अमित निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय सावंत, मयूर थळे व रोशन रुईकर आदी तरुण सहभागी होते.
पाली नगरपंचायत हद्दीतील सर्वच नागरिकांनी या उपक्रमाला खूप मोलाची साथ दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी होत आहे. परिणामी आदिवासी वाड्यापाड्यावरील नागरिकांची होळी गोड होत आहे.
रोशन रुईकर,
तरुण, पाली