मुंबई | प्रतिनिधी |
राज्याचे उर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीजबीलाची थकबाकी वसूल झाली नाही तर राज्य अंधारात जाईल असा गंभीर इशारा दिला आहे. वीजबीलाची थकबाकी ही 79 हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्यासंदर्भात महावितरणचं प्रेझेंटेशन सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आलं. यामध्ये आधीच्या सरकारने बाकी ठेवलेली वसुलीबाबतही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यावर उपाय व योजना काय करता येतील याबाबत अहवाल तयार करण्यास सांगितलं असल्याची माहिती नितिन राऊत यांनी दिली. थकबाकी आणि वसुलीचा अहवाल हा राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल. तसंच थकबाकीकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर राज्य अंधारात जाईल अशा इशाराही नितिन राऊत यांनी दिला. उर्जा विभागातील मोठी वसुली अद्याप रखडली असल्याचे त्यांनी सांगितले.