। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड लोकसभा निवडणूक प्रक्रीया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनानुसार अंमलबजावणी केली जात आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. या मूलभूत सुविधांची पाहणी आणि तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील मतदान केंद्राची पाहणी केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याचे काम जिल्हाधिकार्यांमार्फत सुरु आहे. जिल्ह्यातील मतदान केंद्रामध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. आवश्यकतेनुसार डागडुजी, दुरुस्ती करावी. सर्व मतदान केंद्रांवर प्रकाश, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्प आदींची व्यवस्था करण्यात यावी.
तसेच मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे, रांगेचे नियोजन करावे. सर्व मतदार केंद्रावर प्रथमोपचार सुविधा बरोबरच एक आरोग्य कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात यावा. आवश्यक ती सर्व औषधे मतदान केंद्रावर ठेवण्यात यावीत असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्राची पाहणी समितीच्या मार्फत केली जाणार आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याची माहिती जिल्हाधिकार्यांना दिली जाणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बुधवारी अलिबाग चेंढरे येथील सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूल येथील मतदान केंद्राची पाहणी केली. यांच्या समवेद अलिबाग उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, निवडणूक नायब तहसिलदार अजित टोळकर आदी निवडणूक विभाग कर्मचारी उपस्थित होते.
16 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क रायगड लोकसभा मतदार संघात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड या चार विधानसभा तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर दापोली या दोन विधानसभांचा समावेश आहे. तसेच, मावळ लोकसभा मतदार संघात रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल, उरण या तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. रायगड लोकसभा मतदार संघात 16 लाख 53 हजार 935 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 8 लाख 13 हजार 515, महिला 8 लाख 40 हजार 416 मतदारांचा समावेश आहे.
7 मे रोजी होणार मतदान उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल असणार असून अर्जाची छाननी 20 एप्रिल रोजी केली जाणार आहे. अर्ज माघार घेण्याची प्रक्रीया 22 एप्रिल त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघात दोन हजार 185 मतदान केंद्र आहेत. त्यात सहा संवेदनशील मतदान केंद्र आहेत. मतदान सात मे रोजी होणार असून मतमोजणी चार जूनला होणार आहे.