| रायगड | खास प्रतिनिधी |
पीएनपी शाळा वेश्वी येथील किशोरवयीन मुलींसाठी गुड टच बॅड टच याविषयी डॉ.अॅड. निहा राऊत यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा, वेश्वी गोंधळपाडा येथे अलिबाग पंचायत समिती दहा टक्के सेस अनुदानातून एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्यासंयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. डॉ.अॅड. निहा राऊत यांनी किशोरवयीन मुलींना स्वतःचे संरक्षण कसे करायचे तसेच, गुड टच बॅड टच याविषयी अत्यंत सुंदर असे मार्गदर्शन केले.
विद्यार्थीनींबरोबर मोकळेपणाने चर्चा केली तसेच, विदयार्थीनीने आपली मते व्यक्त करून छान सहभाग घेतला. तसेच संस्थेच्या कार्याला देखील शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी पीएनपी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, प्रिझम सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू तपस्वी गोंधळी, पीएनपी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश मगर यांनी केले, तर आभार रीना म्हात्रे यांनी मानले.