। चितगाव । वार्ताहर ।
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना 30 एप्रिलपासून चितगावला सुरू झाला आहे. या सामन्याच्या दुसर्या दिवशी म्हणजे रविवारी (31 मार्च) बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांकडून एक गमतीशीर चूक झाली.
या सामन्यात श्रीलंकेने पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली. दरम्यान, श्रीलंकेच्या पहिल्या डावात 6 बाद 419 धावा झालेल्या असताना 121 व्या षटकात श्रीलंकेचा फलंदाज प्रभात जयसुर्या खलीद अहमदच्या गोलंदाजीचा सामना करत होता. यावेळी खलीदने टाकलेला चेंडू प्रभातच्या बॅटची कड घेत मागे गेला.
यावेळी पहिल्या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या कर्णधार नजमुल हुसेन शान्तोकडून झेल सुटला आणि हवेत उडाला. यावेळी स्लीपलाच क्षेत्ररक्षण करत असलेल्या शहादत हुसेन दिपूने झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्यालाही त्यात अपयश आले. त्यानंतर झाकिर हसननेही झेलसाठी डाईव्ह मारली, परंतु त्याच्याही हातात चेंडू आला नाही. अखेर प्रभातला जीवदान मिळाले.







