| पनवेल | प्रतिनिधी |
एकेकाळी संपूर्ण रायगड जिल्ह्यात दबदबा निर्माण करणाऱ्या पनवेलच्या क्रिकेटला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शहरात आधुनिक क्रिकेट मैदान विकसित करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत मांडण्यात आलेल्या या प्रस्तावानुसार, प्रभाग समिती ‘ड’ अंतर्गत प्रभाग क्रमांक 14 मधील भूखंड क्रमांक 508 (पार्ट) आणि 520 (पार्ट) येथे क्रिकेट मैदान उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे 1 कोटी 26 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नगरसेवक सुमित उल्हास झुंजारराव यांनी या मैदानासाठी पुढाकार घेतला आहे. एकेकाळी पनवेलच्या क्रिकेटविश्वात सोसायटी, युनिटी, नानू फूलवाद, हरिओम, नवज्योत, स्मॅश, इलेव्हन फायटर आणि मंगलमूर्ती यांसारख्या संघांनी आपला ठसा उमटवला होता. मिडल क्लास सोसायटी आणि व्ही. के. स्कूलच्या मैदानांवर नियमित सराव करून अनेक गुणवंत खेळाडू घडले. मात्र, वाढते शहरीकरण आणि मैदानांची कमतरता यामुळे क्रिकेट सरावासाठी उपलब्ध जागा कमी होत गेल्या. परिणामी, स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सराव सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रस्तावित मैदानात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी झुंजारराव यांनी केली आहे.







