। पनवेल । प्रतिनिधी ।
तळोजा हद्दीतील क्राउन कंपनी चौक येथे डंपर आणि ऑटो रिक्षामध्ये अपघात झाल्याची घटना घडली. अपघातामुळे रिक्षा पलटी होत असल्याचे लक्षात येताच घटनास्थळी वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने तत्काळ धाव घेत रिक्षा धरून ठेवली. त्यामुळे रिक्षातील दोन महिला प्रवासी आणि चालक अशा तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
पोलीस शिपाई जाधव यांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतकार्य सुरू केले. रिक्षा पलटी होऊ नये म्हणून त्यांनी ती धरून ठेवली आणि त्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. यावेळी पोलीस शिपाई दराडे तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान गणेश शिंदे यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. रिक्षाचालक आणि प्रवाशांनी कोणतीही तक्रार देण्याची इच्छा नसल्याचे सांगितल्याने रिक्षाचालक, प्रवासी आणि डंपरचालक तेथून निघून गेले. अपघाताच्या प्रसंगी क्षणाचाही विलंब न करता मदतीला धावून जाणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.






