। नागोठणे । प्रतिनिधी ।
कांदिवली – मुंबईवरून घराडी ता. मंडणगड येथे जात असलेल्या स्कुटीला मुंबईवरून श्रीवर्धनला जाणाऱ्या शिवशाही एस. टी. बसने मागील बाजूस दिलेल्या धडकेत स्कुटीवर मागे बसलेले नालासोपारा येथील विकास सोनू मोगरे (40) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर स्कुटी चालक अभिषेक हरिश्चंद्र मोगरे (34) रा. कांदिवली हे किरकोळ जखमी झाले आहेत. हे दोघेही जण मूळचे भराडी, तालुका – मंडणगड येथे राहणारे आहेत. हा अपघात मुंबई -गोवा महामार्गावर नागोठणे गावाच्या हद्दीत सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नागोठण्यातील मुंबई- गोवा महामार्गावरील रमाई नगर परिसरातील उड्डाण पुलावर घडला.
यासंदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, स्कुटीवरील दोघेजण आपल्या मूळ गावी भराडी, मंडणगड येथे जात होते. महामार्गावर कामात हॉटेलच्या पुढील उड्डाणपुलावर ते आले असता मुंबईहून श्रीवर्धनकडे जाणाऱ्या एसटी बसचा चालक संजय कोंडीबा टाकळकर (47) सध्या रा. जामकर चाळ, श्रीवर्धन तर मूळ यवतमाळ याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील एस.टी. बस हीे वाहन भरधाव वेगाने चालवून स्कुटीला पाठीमागे धडक दिली. या धडकेत स्कुटीवर मागे बसलेले विकास सोनू मोगरे हे रस्त्यावर खाली पडून त्यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या अपघाताच्या पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार ए. एस. शेरमकर या करीत आहेत.






