। नागोठणे । वार्ताहर ।
राज्यात 106 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाने एक प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली असती तर भविष्यात जनतेने त्यांना एकहाती सत्ता दिली असती. मात्र मासा जसा पाण्यावाचून तडफडतो, तसे सत्तेसाठी ते कुकर्म करत गेले. सेना फोडून सत्तेत सहभागी झाले. बहुमत झाल्यानंतरही यांची भूक न भागल्याने त्यांनी राष्ट्रवादी फोडली. तरी ही त्यांची भूक न भागल्याने त्यांनी अशोक चव्हाणांना फोडले. त्यामुळे भिमाने जसा बकासुर राक्षसाचा वध केला. तसाच महाराष्ट्राची जनता सुज्ञ असल्याने भाजपरुपी बकासुराचा वध नक्कीच करेल. त्यामुळे रायगडच्या निवडणुकीची मला चिंता नसल्याचा दृढ आत्मविश्वास इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी व्यक्त केला.
नागोठण्यातील गांधी चौकात शुक्रवारी (दि.5) आयोजित केलेल्या जनसंवाद सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल तटकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील, सहसंपर्क प्रमुख किशोर जैन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे, शेकाप नेते शंकरराव म्हसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, सर्वहारा जन आंदोलन प्रमुख उल्का महाजन, सुरेंद्र म्हात्रे, अविनाश म्हात्रे, सुधीर ढाणे, सुनील देशमुख, समीर शेडगे, संजय भोसले, संजय महाडिक, डॉ. मिलिंद धात्रक, सुरेश जैन, अशपाक पानसरे, बिलाल कुरेशी, नागोठणे सरपंच सुप्रियाताई महाडिक, उपसरपंच अखलाक पानसरे, संजय काकडे, कार्तिक जैन, धनंजय जगताप, ज्ञानेश्वर साळुंखे, वांगणी सरपंच सोनम भोसले, वरवठणे सरपंच ऋतुजा म्हात्रे, धनवंती दाभाडे, दीप्ती दुर्गावले, कांचन माळी, डॉ. अन्वर हाफिज, प्रणिता पत्की, अनिल महाडिक, राजेंद्र वाळंज, मोहन नागोठणेकर, अजित दळवी, प्रणव रावकर, शेखर जोगत आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनिल तटकरे म्हणाले की, पवार साहेब मुख्यमंत्री असतांना त्यांनी आयपीसीएल प्रकल्पग्रस्तांना नोकरीला लावले. नागोठण्यातील जनता सुज्ञ आहे. माझ्या 50 हजार मतांत नागोठण्याचा मोठा वाटा आहे. येथील शुद्ध पाणीपुरवठा योजनेचे पत्र मी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र बोलवून दिले होते. तसेच येथील एक मुस्लीम भगिनी निलोफर पानसरेंना सरपंच केल्याचा मला आनंद असल्याचेही सांगून आज बॅ. अंतुले साहेब हयात असते तर त्यांनीही गीतेंनाच आशिर्वाद दिले असते, असे बोलून अनंत गीतेंना विजयी करण्याचे आवाहन केले.
गांधी चौकात सभा सुरु झाल्यानंतर थोड्याच वेळाने पवित्र रमजानमधील अजान झाल्यानंतर थोडावेळ सभा स्थगित करण्यात आली. यावेळी उपस्थित मुस्लीम बंधू-भगिनींनी त्यांना एक मुस्लीम तरुण अशपाक सुमरा यांच्याकडून वाटण्यात आलेले खजूर खाऊन, पाणी पिऊन रोजा इफतार केला. नंदा म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सद्यस्थितीत काँग्रेसच देश वाचवू शकतो. आम्ही चिन्ह, उमेदवार बघत नाही तर मोदी नावाच्या माणसाला घरी कसे पाठवायचे हे बघत असल्याचे सांगितले. तसेच शंकरराव म्हसकर यांनी जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणार्या, स्वच्छ चारित्र्याच्या तसेच पाय जमिनीवरच असलेल्या गीतेंना निवडून देण्याचे आवाहन केले. सभेचे सूत्रसंचालन प्रकाश कांबळे व कीर्तीकुमार कळस यांनी केले.
नागोठणे ग्रामपंचायतीत सर्वजण येऊन गेले. मात्र समारोपाला गांधी चौकात एकच सभा घेऊन विरोधकांना भुईसपाट करीत 17 पैकी 16 जागा जिंकून इंडिया आघाडीचा पहिला विजय नागोठण्यात साकारला. गांधी चौकात आपली सभा झाली की, 100 टक्के विजय आपलाच! अशी ही जागा असल्याने ही सभा म्हणजे गीतेसाहेब खासदार झाल्यासारखेच आहे. शहरातच दोन-अडीच हजारांचा लीड मिळणार नक्की मिळणार.
किशोर जैन
मी कोणत्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी नसून 33 वर्षे जनचळवळीत आहे. मात्र संविधान बदलण्यास निघालेल्या भाजपविरोधात मी व्यासपीठावर आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन भाजपा हटाव, देश बचाव या चळवळीत सहभागी व्हावे.
उल्का महाजन,
सामाजिक कार्यकर्त्या