| पोलादपूर | वार्ताहर |
तालुक्यामध्ये वणव्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली असून लोहारे येथील एका गोठयाला आग लागल्याच्या घटनेनंतर एकाही शासकीय यंत्रणेची आग लागल्याची गांभिर्याने दखल घेतली नव्हती तर महाबळेश्वर मार्गावरील मोरगिरी फाट्याजवळील एका जुन्या वटवृक्षाला लागलेली आग विझविण्यासाठी तब्बल दोन ठिकाणचे अग्निशमन बंब उपलब्ध झाल्याने पोलादपूर तालुक्यामध्ये अग्निशमन यंत्रणेची गरज स्पष्ट झाली आहे.
पोलादपूर तालुक्यामध्ये महिन्यामधून दोन-चार वणव्यामुळे गुरांच्या गोठयाला अथवा लोकवस्तीतील घरांना आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे उन्हाळयाच्या ॠतूमध्ये दिसून आले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये वणव्यांची आग थेट गुरांच्या वाडयापर्यंत पोहोचून गुरे आणि चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याच्या घटनांमध्ये शासनाकडून मदत मिळण्याची शाश्वती नसताना आग विझविण्यासाठीदेखील तातडीची मदत मिळण्याची शक्यता नसल्याचा अनुभव लोहारे येथील ग्रामस्थांना आल्याची माहिती माजी सरपंच प्रदीप सुर्वे यांनी दिली. 1 एप्रिल रोजी एप्रिलफुल बनविण्यासाठी धावपळ करणारे कॉल येतील, अशी शक्यता गृहित धरून अशा कॉलवर तसेच उत्तर देण्याची मानसिक तयारी करून ठेवलेल्या सरकारी कार्यालयांतील कर्मचार्यांनी लोहारे येथील गुरांचा गोठा जळल्याची माहिती देणारा तसेच अग्निशमन बंबाची मागणी करणारा फोन यादिवशी आल्यानंतर आमच्याकडे महाड नगरपरिषद आणि महाड एमआयडीसी अग्निशमन यंत्रणेचे फोन नंबर नसल्याचे सांगून असहकार पुकारला. या प्रकारानंतर अग्निशमन यंत्रणेची नितांत गरज पोलादपूर तालुक्याला असल्याचे उघड झाले होते.
पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील एक जुनाट वडाचे झाड सायंकाळी साडेचार वाजल्यानंतर पेटत असल्याचे दिसल्याने महाड एमआयडीसीच्या अग्निशमन यंत्रणेला फोन केला असता एक अग्निशमन बंब तातडीने आग विझवून गेला. मात्र, रात्री पुन्हा या वडाच्या झाडामध्ये आग भडकली आणि महाड नगरपरिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी येऊन पाण्याचा मारा करीत पहाटेपर्यंत दुसर्यांदा आग विझवून गेला. मात्र, तरीदेखील पहाटेपर्यंत हा वटवृक्ष आतून जळतच राहिल्याने सकाळी 11 वाजता प्रमोद दिक्षित यांनी मोरगिरी ग्रामपंचायत सरपंच, तहसिलदार, बांधकाम उपविभाग आणि पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर अर्ज देऊन शनिवारी पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची संख्या जास्त असल्याने हे झाड कोसळल्यास रस्ता वाहतुकीस बंद होऊन वाहतुकीची कोंडी होऊ शकते तसेच झाड अथवा झाडाची फांदी वाहनावर कोसळल्यास जिवितहानी होऊ शकते, अशी शक्यता लेखी अर्जातून वर्तवित तातडीने संभाव्य धोका दूर करण्याची मागणी केली आहे.
पोलादपूर नगरपंचायत कार्यालयामध्ये किमान 100 फूट उंचापर्यंत पाण्याचा जोरदार मारा करणार्या मशिनची खरेदी चार वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, या मशिनचा वापर कधीही आगीच्या घटनांमध्ये करण्यात आला नसल्याने प्रत्यक्षात अग्निशमन बंब आणि प्रशिक्षित अग्निशमन बलाची उपलब्धता पोलादपूर नगरपंचायत क्षेत्रात उपलब्ध होण्याची गरज स्पष्ट झाली आहे.