। पेण । प्रतिनिधी ।
नवी मुंबईला पाणी पुरवठा करणार्या हेटवणे धरणाच्या पाण्याची पातळी अतिशय वेगाने घटत असून सद्यस्थितीत हेटवणे धरणात फक्त 41 टक्के पाणी शिल्लक आहे. म्हणजेच शिल्लक असलेला 59 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवणार असल्याची माहिती हेटवणे प्रकल्पाचे उपअभियंता आकाश ठोंबरे यांनी दिली.
हेटवणे धरणातून नवी मुंबई बरोबरच पेण तालुक्यालाही पाणी पुरवठा हा होत असतो. परंतु यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेने पाण्याचा साठा कमी आहे. एप्रिल, मे आणि जून या महिन्यांपर्यंत हा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. परिणामी, मान्सून वेळेवर सुरू झाला नाही तर याचा फटका नवी मुंबईसह पेण तालुक्याला सोसावा लागणार आहे. मात्र मान्सूनची सुरूवात यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार 11 जूनपर्यंत होणार असल्याने हेटवणे धरणातील पाणीसाठा हा नवी मुंबईसह पेण तालुक्याला पुरणारा आहे. असे असले तरी पाणी जपून वापरण्याचे आवाहनदेखील आकाश ठोंबरे यांनी केले.