| मुंबई | प्रतिनिधी |
बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना ही आमचीच शिवसेना असल्याचा छातीठोकपणे दावा करणार्या शिंदे गटाच्या शिवसेनेवर इतकी नामुष्की ओढवली जाईल असं शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदेसोबत गेलेल्या खासदार, आमदारांना स्वप्नातही वाटले नव्हते. हिंगोलीत विद्यमान खा. हेमंत पाटील यांना शिंदे यांच्याकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतरसुद्धा भाजपाच्या दबावामुळे त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की एकनाथ शिंदे यांच्यावर ओढवली आहे.
दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधणार्या यवतमाळ-वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचाही पत्ता कट करण्यात आला आहे. अजून लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील अनेक जागांवर उमेदवारांची घोषणा बाकी असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही फार कठीण अवस्था झाली आहे. भाजपाच्या वाढत्या दबावाखाली ते पूर्णतः झुकले असून नाराज खासदारांना आणि नेत्यांना काय उत्तर द्यावं? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. अबकी बार देशात 400 पार आणि महाराष्ट्रात 45 पार हा भाजपाचा स्पष्ट नारा आहे. त्यातही भाजपाचं कमळ चिन्हावर 370 खासदार निवडून येतील असा आत्मविश्वासही भाजपाला आहे. परंतु, या 370 च्या नादात सहयोगी पक्षाच्या विद्यमान खासदारांचा बळी जात आहे. याचीच प्रचिती महाराष्ट्रात आली आहे.







