। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताचा पुरुष हॉकी संघ शनिवारपासुन बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी दोन हात करत आहे. 2014 नंतर भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलियात हॉकी मालिका विजय मिळवता आलेला नाही. यंदा तरी दहा वर्षांची प्रतीक्षा संपणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पॅरिस ऑलिंपिकच्या तयारीसाठी दोन देशांमधील पाच सामन्यांची मालिका महत्त्वाची ठरणार आहे.
भारतीय संघ क्रमवारीत चौथ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियन संघ पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन देशांमध्ये रोमहर्षक लढत हॉकीप्रेमींना पाहायला मिळणार हे निश्चित आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात भारतीय हॉकी संघाने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या प्रो हॉकी लीगमधील लढतींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. भुवनेश्वरमध्ये झालेल्या चारपैकी तीन लढतींमध्ये त्यांनी विजय मिळवला. तसेच रौरकेला येथे झालेल्या लढतींमध्ये भारतीय संघ पराभूत झालेला नाही. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही लढतींमध्ये त्यांना हार पत्करावी लागली. त्यामुळे भारतासाठी पाच सामन्यांची मालिका खडतर असणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 2013 पासून 43 सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने 28 सामन्यांमध्ये विजय मिळवले असून भारतीय संघाला फक्त आठ सामन्यांमध्ये विजय मिळवता आले आहेत. दोन देशांमधील सात सामने ड्रॉ राहिले आहेत. मागील अकरा वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकता कांगारू अर्थातच ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून येत आहे.
हॉकी मालिकेचे वेळापत्रक पहिला सामना - 6 एप्रिल (दुपारी 2 वाजता) दुसरा सामना - 7 एप्रिल (दुपारी 2 वाजता) तिसरा सामना - 10 एप्रिल (दुपारी 3 वाजता) चौथा सामना - 12 एप्रिल (दुपारी 3 वाजता) पाचवा सामना - 13 एप्रिल (दुपारी 2 वाजता)