| पुणे | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीपासूनच माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेत होता. अद्याप माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे. भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने माढ्यातील मोहिते पाटील नाराज झाले आणि अखेर हीच नाराजी आता बंडखोरीत रुपांतरीत होणार असल्याची माहिती मिळाली आहे. अखेर आता धैर्यशील मोहिते पाटील बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करु शकतात. येत्या 13 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीत मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. यावरुन भाजप नेते आणि माढ्यातील राजकीय वर्तुळातील मोठे नाव असलेले मोहिते पाटील नाराज झाले. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मोहिते पाटलांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पण उमेदवारी निंबाळकरांच्या पारड्यात पडली आणि संपूर्ण माढ्याने अनेक राजकीय घडामोडी अनुभवल्या. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही केवळ माढा वगळता इतर सर्व जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. आता शरद पवार गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या 13 एप्रिलला मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, अशी माहिती मिळाली आहे.
येत्या 13 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत अकलूजमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. उमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांची बंडखोरी टाळण्याचे प्रयत्न केले. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. मोहिते पाटलांच्या पक्ष प्रवेशनाने माढा लोकसभेसह सोलापूर लोकसभा मतदारसंघातही भाजपला फटका बसू शकतो.