। म्हसळा । वार्ताहर ।
आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रांताधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा आदिवासी वाडी येथे विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, महसूल तहसीलदार धर्मराज पाटील, निवासी नायब तहसीलदार गणेश तेलंगे, म्हसळा तलाठी गोरख माने व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी महेश पाटील यांनी मतदानाचे महत्व पटवून दिले. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी खूप कमी प्रमाणात दिसून आली असून मतदानाचे महत्व वाढविले पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानविषयी जनजागृती करणे महत्वाचे असून वाडी वस्तीवरील किंवा बागा राखणेसाठी अन्यत्र बाहेर गेले असलेल्यांना मतदानासाठी उपस्थित राहण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन महेश पाटील यांनी केले आहे. तसेच, मतदान प्रक्रिया हा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवात प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपला सहभाग नोंदवावा. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे महत्वाचे असल्याचे हि महेश पाटील यांनी सांगितले.