विदितचाही विजय; गुकेश पहिल्या स्थानावर कायम
। टोरंटो । वृत्तसंस्था ।
भारताच्या पुरुष खेळाडूंनी आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील सहाव्या फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली. आर. प्रज्ञानंद व विदित गुजराथी यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करीत महत्त्वाचा गुण मिळवला, तर डी. गुकेशने लढत ड्रॉ राखत इयान नेपोनियात्ची याच्यासोबत संयुक्तपणे अव्वल स्थान कायम राखले. भारताचा युवा स्टार आर. प्रज्ञानंद याने आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील सहाव्या फेरीत अझरबैझानच्या निजात एबासोव याच्यावर विजय मिळवला. एबासोव याच्याविरुद्धच्या लढतीत प्रज्ञानंदचे पारडे जड समजले जात होते. प्रत्यक्षात प्रज्ञानंद याने निराशही केले नाही. त्याने अपेक्षेनुसार खेळ करीत एबासोववर वर्चस्व गाजवले. प्रज्ञानंद या लढतीत तांत्रिकदृष्ट्या सरस ठरला, हे विशेष.
विदित गुजराथी याला मागील दोन लढतींत निराशेचा सामना करावा लागला होता; पण बुधवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत त्याने झोकात पुनरागमन केले. त्याने फ्रान्सच्या फिरॉझा एलिरेझा याला नमवले. गुजराथी याने या लढतीत क्लासिकल पद्धतीने सुरुवात केली. या सुरुवातीचा फायदा त्याला झाला. एलिरेझाकडून सुरुवातीलाच मोठी चूक घडली. अखेर गुजराथीने याने विजयावर मोहोर उमटवली. डी. गुकेश – हिकारू नाकामुरा यांच्यामधील लढत ड्रॉ झाली.
पुरुष विभाग क्रमवारी 1) डी. गुकेश (4 गुण) 1) इयान नेपोनियात्ची (4 गुण) 3) फॅबियानो कॅरुअना (3.5 गुण) 4) आर. प्रज्ञानंद (3.5 गुण) 5) विदित गुजराथी (3 गुण) 6) हिकारू नाकामुरा (3 गुण) 7) एलिरेझा फिरॉझा (1.5 गुण) 8) निजात एबासोव (1.5 गुण). (टीप - डी. गुकेश व इयान नेपोनियात्ची हे खेळाडू प्रत्येकी चार गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत).
महिला खेळाडूंकडून निराशा एकीकडे भारतीय पुरुष खेळाडूंनी बुधवारी रात्री झालेल्या लढतींमध्ये शानदार कामगिरी केली असली, तरी भारताच्या महिला खेळाडूंना निराशेला सामोरे जावे लागले. रशियाच्या कॅटरिना लागनो हिच्याकडून आर. वैशालीचा पराभव झाला. चीनच्या टिंगजी लेई हिने कोनेरू हम्पीला नमवले. महिला विभागात चीनची टॅन झोंगयी 4.5 गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे.