| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कॉलनी फोरमच्या अध्यक्ष लीना गरड यांनी सोमवारी (दि. 15) शिवसेनेत प्रवेश केला. लीना गरड या पनवेल पालिकेच्या माजी नगरसेविका असून, दुहेरी मालमत्ता कराविरोधात आक्रमक भूमिका घेत त्या पालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपापासून दूर झाल्या होत्या. दादर येथील शिवसेना भावनात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना (उबाठा) गटाचे पनवेलमधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरड यांच्यासोबत कॉलनी फोरमच्या कामोठे, खारघर तसेच पनवेलमधील असंख्य कार्यकर्त्यांनीदेखील उबाठा गटात प्रवेश केल्याने पनवेलमध्ये उबाठा गटाची ताकद वाढणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीत याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना होण्याची शक्यता आहे. पक्षप्रवेश सोहळ्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, खारघरमधील पदाधिकारी नंदू वारुंगसे उपस्थित होते.