सुरक्षा रोप बसविल्याने दुर्गप्रेमी सुखावले
| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील भेलिव येथील मृगगड हा किल्ला ऐतिहासिक व महत्वपूर्ण किल्ला आहे. मृगगड किल्ल्यावर ट्रेकर आणि पर्यटकांचा येण्याच्या ओघ वाढला आहे. मात्र, मागील काही वर्षांत पावसाळ्यात केल्या जाणाऱ्या ट्रेकिंगमुळे आणि निष्काळजीपणामुळे काही अपघात झाले आहेत. तसेच, किल्ल्यावरून पडून काही लोकांना गंभीर दुखापत झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता दुर्गवीर प्रतिष्ठानातर्फे नुकतेच मृगगडावर धातूचे सुरक्षा रोप लावून किल्ला सुरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गप्रेमी, ट्रेकर व ग्रामस्थ सुखावले आहेत.
दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून गेली 13 वर्षे किल्ल्यावर संवर्धनाचे काम सुरू आहे. किल्ल्यावरील पाण्याचे टाके, वास्तू आणि माहिती फलक अशी अनेक कामे केली गेली. त्यामुळे किल्ला आज सुस्थितीत बघायला मिळत आहे.
किल्ल्यावरील कातळ कोरीव पायऱ्या पावसाळ्यात शेवाळामुळे निसरड्या होतात. गवत वाढल्यामुळे आणि वरून माती वाहून आल्यामुळे त्यावर पाय नीट ठेवता येत नाही. चढाई-उतराई करताना खूप सावधपणे वावर करायला लागतो नाहीतर अपघात होतात. ही गंभीर समस्या लक्षात आल्यावर आणि भविष्यात किल्ल्यावर येणाऱ्या लोकांचा ओघ बघता येथील मार्ग सुरक्षित करणे गरजेचे होते. कारण कोणताही अपघात झाल्यावर लोकं किल्ल्याला नावं ठेवतात. येथे येणाऱ्या पर्यटकांची काही चूक आहे का, ते बघितले जात नाही. त्यामुळे दुर्गवीर प्रतिष्ठानातर्फे रेकी केली आणि मार्ग सुरक्षित करण्याचे नियोजन करण्यात आले व मृगगडावर धातूचे सुरक्षा रोप लावल्याने किल्ला सुरक्षित झाला आहे.
या मोहिमेत दुर्गवीर प्रतिष्ठानचे अर्जुन दळवी, प्रशांत डिंगणकर, विठ्ठल केंबळे, प्रमोद डोंगरे, कृपेश बेलकर, रुपेश लाखाडे, अजय शिंदे, अमोल सुर्वे, प्रतीक सुर्वे, सिद्धांत शिंदे, राज मेस्त्री, महेश सावंत, प्रतीक पाटेकर, प्रतीक इंदुलकर, प्रतीक भोंनकर, स्वप्नील भगत आणि ऋषिकेश मसने हे दुर्गवीर सहभागी झाले होते.
एक मोठी मोहीम सुरक्षितरित्या पूर्ण झाल्याची आणि किल्ला आता खऱ्या अर्थाने येणाऱ्या गिर्यारोहक आणि पर्यटकांसाठी सुरक्षित झाला, याचे खूप समाधान वाटले. पूर्ण टीमचे अभिनंदन.
संतोष हसुरकर, अध्यक्ष, दुर्गवीर प्रतिष्ठान
..आणि मृगगड झाला सुरक्षित कामासाठी लागणारे सगळे सामान वायर रोप, बोल्ट, फिशर प्लेट, यु क्लॅम्प आदी सर्व साहित्य खरेदी केले. ठरल्याप्रमाणे सगळ्या टीम मुंबईतून किल्ल्याच्या पायथ्याच्या भेलिव गावासाठी रवाना झाल्या. त्यांनतर टीम किल्ल्यावर पोहचली आणि लगेच कामाला सुरुवात झाली. कुठे बोल्टिंग करायची आहे याची मार्किंग करण्यात आली आणि ड्रिल मशीनने बोल्टिंगला सुरुवात झाली. खिंडीमध्ये आणि पायरी मार्गावर एकूण 18 बोल्ट मारण्यात आले आणि फिशर प्लेट लावण्यात आली. दोन बोल्टमधील मार्किंग केल्याप्रमाणे वायर रोप कापण्यात आला आणि माप घेतल्याप्रमाणे रोप लावण्यास सुरुवात झाली. यु क्लॅम्प लावून सगळे रोप लावण्यात आले आणि मृगगड सुरक्षित झाला.
अनेकांची मदत या सर्व मोहिमेत दुर्गवीरांसोबत टेक्निकल टीम म्हणून ॲडव्हेंचर इंडीया टीममधून प्रशांत खैरनार, अमित खरात, मनोज भालेघरे आणि मंगेश बाळू कोयंडे यांची खरी मदत झाली. तसेच, लोणावळ्यातील शिवदुर्ग संस्थेने बॅटरीवर चालणारी ड्रिल मशीन दिली.
मृगगडावर आजवर झालेली कामे गडावरील महत्त्वाची पाण्याची टाकी स्वच्छता मोहिम. गडावर इतिहास माहिती फलक लावले. गडपायथा ते गडापर्यंत दिशादर्शक फलक लावले. गड पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा एक वर्ग पुनः बांधणी करण्यात आला.