। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे. कुपोषित बालकांना कुपोषणाच्या रेषेतून बाहेर काढण्यासाठी तालुक्यातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. उपेंद्र सुगवेकर यांच्याकडून तीव्र कुपोषित आणि अतितीव्र कुपोषित बालकांची तपासणी करण्यात आली. यावेळी तालुक्यातील तब्बल 125 कुपोषित बालकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
नेरळ येथील रहिवाशी आणि मुंबईमधील मोठ्या रुग्णालयात बालरोग तज्ञ म्हणून सेवा देणारे डॉ. उपेंद्र सुगवेकर हे कर्जत तालुक्यातील सर्व कुपोषित बालकांची दरवर्षी तपासणी आणि औषिधोपचार करीत असतात. तालुक्यातील अतितीव्र कुपोषित आणि तीव्र कुपोषित बालकांची संख्या वाढली आहे हे लक्षात घेवून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव यांच्या आवाहनानंतर तालुक्यातील सर्व कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी नेरळ येथील रुग्णालयात करण्यात आली. त्यासाठी कर्जत तालुक्यातील नेरळ, कळंब, मोहीली, कडाव, आंबिवली आणि खांडस या प्राथमिक आरोग्यातील कुपोषित बालकांना तपासणीसाठी नेरळ येथे आणण्यात आले होते.
त्यानुसार कर्जत तालुक्यातील अती तीव्र कुपोषित आणि तीव्र कुपोषित अशा एकूण 125 बालकांची तपासणी यावेळी डॉ. उपेंद्र सुगवेकर आणि त्यांच्या टीमकडून करण्यात आली. त्यातील दुर्धर बालकांवर अधिक लक्ष देउन त्या सर्वांना कुपोषण रेषेतून बाहेर काढण्याचे उदिष्ट असल्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या.