फणसाड अभयारण्यात वन्यजीवांना दिलासा
| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड जंजिरा पर्यटनात प्रसिद्ध अशा फणसाड अभयारण्यात पक्षी व वन्यजीव यांच्यासाठी वनतलाव त्याचप्रमाणे बशी तलाव निर्माण करण्यात आलेले आहेत. या अभयारण्यात नैसर्गिक 27 पाण्याचे स्रोत असतानासुद्धा कृत्रिम असे आठ बशी तलाव तयार करण्यात आले आहेत. बशी तलाव व वनतलावांमध्ये पाणी उपलब्ध होण्यासाठी चार बोअरिंगसुद्धा मारण्यात आलेल्या असून, याद्वारे पाणी या तलावात टाकले जात आहे, तसेच अन्य ठिकाणहूनसुद्धा गाडीच्या साह्याने पाणी आूणन प्राणी व पक्ष्यांची तहान भागवण्याचे काम फणसाड अभयारण्य विभागाकडून केले जात आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांनी माहिती दिली.
या अभयारण्यात काशिद, दांडा, सुपेगाव, सर्वे, वडघर परिसरात या रानगव्यांचा वावर दिसून आला आहे. 21 रानगवे असल्याची नोंद करण्यात आली आहे. भरपूर खाद्य खाणारा व मोठ्या प्रमाणात पाणी पिणारा हा वन्यजीव असल्याने या अभयारण्यात मुबलक पाणी पिण्याची सोय झाल्याने या प्राण्याची तहान भागत असून, प्रजाती वाढत आहे. मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात रानगव्यांची संख्या वाढली आहे. पूर्वी या प्राण्याची संख्या फारच कमी होती, परंतु नव्या आकडेवारीनुसार हीच संख्या 19 च्या वर गेली असली तरी यापेक्षा जास्त रानगवे असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
वन्यजीव व पक्षी यांना कोणतीही पाणीटंचाई उद्भवत नाही. 27 पाणीस्त्रोत येथील गाळ काढण्यात येऊन जास्तीत जास्त पाणीसाठा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. आठ बशी तलाव संपूर्ण पाण्याने रोज भरून ठेवले जातात. यासाठी बाहेरून पाण्याचा टँकर आणून यामध्ये पाणी टाकले जाते. त्याचबरोबर फणसाड क्षेत्रात विहूर धरण, फणसाड धरण, सावरट धरण यामधूनसुद्धा वन्यजीवांना पाणी मिळत असते.
तुषार काळभोर, वनपरिक्षेत्र अधिकारी