पोलादपूर शाखेची ग्राहकसेवा झाली रामभरोसे
| पोलादपूर | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यामध्ये विविध सरकारी विभागांतील कर्मचारी तसेच, अधिकारी लोकसभा निवडणूककामी जुंपले असताना पोलादपूर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील शाखा प्रबंधक आणि अन्य अधिकारी यांना निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. परिणामी, स्टेट बँक ऑफ इंडिया ‘ऑन ड्युटी इलेक्शन’ अशी परिस्थिती झाली आहे. यामुळे पोलादपूर एसबीआय शाखेची ग्राहक सेवा चक्क रामभरोसे झाली असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील शाखा प्रबंधक व कर्मचारी यांना रायगड लोकसभा निवडणूक शाखेने अधिग्रहित केले आहे. यामुळे हे अधिकारी शाखेमध्ये नसल्यामुळे रक्कम ट्रान्सफर करण्याची सेवा तसेच, बँक मॅनेजरच्या सहीने होणार्या ग्राहकसेवा सध्या दिल्या जात नाहीत. यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय झाली असून, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळण्यासाठी ‘शाखा व्यवस्थापकाला निवडणूक ड्युटीसाठी बोलविण्यात आले आहे. त्यामुळे आज चौकशी वगळता सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.’ असा फलक लावण्यात आला आहे.
गेल्या आठवडयातील सलगच्या सुट्टया आणि सोमवारी बॅकेच्या प्रवेशद्वारावर लावलेला फलक पाहून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पोलादपूर शाखेचे ग्राहक गैरसोयीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसून आले.