| पनवेल | वार्ताहर |
33 मावळ लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यातच गेली 10 वर्षे खासदार असलेल्या श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी केवळ कार्यक्रमांना हजेरी लावण्याशिवाय दुसरे कोणतेही काम केले नाही. त्यातच मूळ शिवसेना पक्षाशी गद्दारी केल्याच्या भावनेतून मतदारांनी त्यांना आता डोक्यात ठेवले आहे. पनवेल आणि उरणमधील मतदारांनी आता ओळखीच्या उमेदवाराच्या निष्क्रियतेची पावतीच जणू या निवडणुकीत बारणे यांना देण्याचे ठरविले असल्याचे समोर आले आहे. यातच मागील निवडणुकांचा विचार करता महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवीत होते, मात्र आता महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे मतांच्या आकडेवारीमध्ये मोठा फरक पडत आहे. त्यामुळे पनवेलमध्ये गेली 15 वर्षे आमदारकी भोगलेल्या प्रशांत ठाकूर यांना लोकसभेच्या उमेदवाराला अधिक मते मिळवून देण्याची कसरत करावी लागत असली तरी या निवडणुकीत त्यांचा घाम निघाला असल्याचे चित्र सध्या समोर आले आहे.
नेहमीच राजकारण म्हणजे पैशाचे भांडवल असल्याचे बोलले जाते. सर्वत्र याचीच चर्चा रंगलेली असते. मात्र सध्या पनवेल आणि उरणमधील नागरिक स्थानिक आमदारांवर संतापले आहेत. आम्ही पैसे घेणार पण यांना अपटणार, अशी भावना नागरिक रस्त्यारस्त्यावर बोलताना दिसत आहेत. विकास कामांच्या बाबतीत अकार्यक्षम आमदार म्हणून यांची ख्याती झाली असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे. हेतू पुरस्सर राजकारण करून एखाद्याला कशा पद्धतीने आडवा करायचा हाच धंदा गेली 15 वर्षे पनवेलमध्ये तर गेली 5 वर्षे उरणमध्ये सुरू आहे. अनेक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये हे खेळ खेळण्यात आले आहेत. सत्तेचा दुरुपयोग करण्याचा एकही मार्ग या दोन्ही आमदारांनी सोडला नाही. तसेच गेली 10 वर्षे खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांनीही जनतेच्या कोणत्याही समस्यांना हात घातला नाही. पर्यायाने याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांना बसणार असल्याचे आता समोर आले आहे.







