| म्हसळा | वार्ताहर |
आगामी लोकसभा निवडणुकीत 85 +, दिव्यांग आणि सर्वांनी 100 टक्के मतदान प्रक्रियेत सहभाग हाच लोकशाहीचा पाया असल्याचे मत म्हसळा येथे संपन्न झालेल्या दिव्यांग मतदार जनजागृती कार्यक्रमात बोलताना रायगड लोकसभा मतदारसंघाचे आयकॉन तथा महाराष्ट्र दिव्यांग कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष साईनाथ पवार यांनी म्हसळा येथे बोलताना व्यक्त केले.
तुमचे मत लोकशाही भक्कम करण्यासाठी निश्चितपणे हातभार लावेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. त्यांनी पुढे सांगितले प्रथमच भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार आणि 85 + ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी घरीच मतदान करण्यासाठी विशेष मोहीम राबविली असून, निवडणूक आयोगाला सहकार्य करण्याचे आवाहन साईनाथ पवार यांनी केले. मतदान केंद्रावर व्हील चेअर, ब्रेन लिपीची सोय असलेले मतदान यंत्र, विशेष स्वयंसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांना वेगळी रांग, त्यांच्यासाठी वाहन सुविधा आणि सांकेतिक भाषा अशा सुविधा देणार असल्याचे तहसीलदार समीर घारे यांनी सांगितले.
याप्रसंगी तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, गटविकास अधिकारी जाधव, अपंग सहकारी कल्याणकारी संस्थचे सचिव शिवाजी पाटिल, छाया म्हात्रे, भावना भारुडे, विजय लाड, दयानंद महामूनकर, अब्दुल कवी, किशोर मोहिते, अरुण माळी आदी मान्यवर उपस्थित होते. रमेश जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शेवटी सर्व उपस्थित दिव्यांग व्यक्तींना मतदान करण्याची शपथ देण्यात आली.