| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दक्षिण आफ्रिकन महिला क्रिकेट संघ या वर्षी जून-जुलै महिन्यात भारत दौऱ्यावर मालिका खेळायला येणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी, एकदिवसीय व टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय व टी-20 मालिका बंगळूरमध्ये, तर कसोटी चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका या दोन देशांमध्ये 16 जूनपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. चेन्नईमध्ये 28 जूनपासून एकमेव कसोटीला सुरुवात होईल. त्यानंतर पाच, सात व नऊ जुलै रोजी बंगळूरत टी-20 मालिकेचा थरार रंगणार आहे.
यावर्षी सप्टेंबर महिन्यात महिलांचा टी-20 विश्वकरंडक खेळवला जाणार आहे. त्याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सरावासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. बीसीसीआय व दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाच्या पुढाकाराने दोन देशांमध्ये एकमेव कसोटीचे आयोजन करण्यात येणार आहे. याआधी गेल्यावर्षी भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध प्रत्येकी एक कसोटी सामना खेळला. या दोन्ही कसोटींत भारतीय संघाने विजय संपादन केले.