1795 मतदान केंद्रांवर स्वयंसेवक; 18 वर्षांखालील तरुणांवर जबाबदारी
। रायगड । सुयोग आंग्रे ।
आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मदतनीस देण्यासाठी निवडणूक प्रशासनाने तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर दिव्यांगांसाठी काम करणार्या जिल्ह्यातील संस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. मतदानादिवशी या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील 12 हजार 363 दिव्यागांची यादी निवडणूक प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. यामध्ये सहा हजार 451 दिव्यांग मतदार रायगड मतदारसंघात, तर पाच हजार 912 मावळ मतदारसंघात मतदान करणार आहेत. मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची मदतनीस म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हे स्वयंसेवक युवक असणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर प्रशासन जनजागृती करीत आहे. याअंतर्गत अपंगत्व हे मतदानात अडथळा ठरू नये यासाठी प्रशासन दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचत आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत उमेदवारांचे कार्यकर्तेच दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत घेऊन येत आणि घरी पोहोचवत. यावर विरोधी उमेदवारांकडून आक्षेप, तक्रारी घेतल्या जातात. त्यामुळे निवडणूक प्रशासन त्यांना मदतनीस मिळवून देणार आहे. मदतनीसांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षणही देण्यात आले आहे. सुधारित अपंग हक्क कायद्याच्या अंमलबजावणीनंतर अशा प्रकारे दिव्यांग मतदारांना सेवा, सुविधा दिल्या जाणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांची संख्या लक्षात घेता जिल्हा निवडणूक विभागाने 1795 मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी 18 वर्षांखालील युवकांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती केली आहे. दिव्यांग मतदारांबरोबरच वयोवृद्ध मतदारांनादेखील हे स्वयंसेवक मदत करणार आहेत.
अंध मतदारांना ब्रेलपट्टी पूर्णपणे अंध मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान यंत्रावर ब्रेल लिपीतील पट्टी असणार आहे. मदतनिसाने संबंधित मतदारास त्या पट्टीची ओळख करून द्यायची आहे. नंतर ते स्वत: मतदान करतील. दोन्ही पायांनी अपंग मतदारांना व्हीलचेअरवर बसून मतदान करता येईल, असे मतदान यंत्र बसविण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. दृष्टी कमी आणि मानसिक विकारग्रस्त मतदारांना मतदान करताना जादा वेळ देण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मदतनीस देण्यात येईल. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आतापासून जागृती केली जात आहे. दिव्यांगासाठी काम कारणार्या संस्थांची यासाठी मदत घेण्यात येणार आहे. पूर्णपणे अंध मतदारांनाही मतदान करता यावे यासाठी यंत्रावर ब्रेल लिपीतील पट्टी असेल. कोणत्याही प्रकारच्या दिव्यांगांना मतदान करता येईल याची दक्षता घेत आहोत. मतदान केंद्रांवर दिव्यांगांच्या मदतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची नियुक्ती मदतनीस म्हणून केली जाणार आहे.
स्नेहा उबाळे ,
निवडणूक उपजिल्हाधिकारी,
रायगड
रायगड लोकसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांचे 100 टक्के मतदान करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी विधानसभानिहाय दिव्यांगांसाठी काम करणार्या संस्थांची मदत घेतली आहे. तालुकानिहाय बैठक घेऊन दिव्यांगांनादेखील मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मतदारसंघातील दिव्यांग मतदारांचा आढावा यंत्रणांमार्फत घेण्यात आला आहे. दिव्यांग मतदारांना मदतनीस म्हणून 18 वर्षाखालील युवकांची नेमणूक करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी काम करणार्या संस्थांनी मतदान प्रक्रियेत झोकून काम केले आहे.
साईनाथ पवार,
दिव्यांग आयकॉन रायगड