करवंदांच्या पिकालाही फटका; आदिवासी हताश
। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी परिसरात यंदाच्या वर्षी खराब हवामानाचा फटका जांभूळ, करवंद पिकाला बसला आहे. तसेच, जांभळाच्या झाडांना मोहोर उशिरा आणि कमी आला असल्याने बाजारात जांभळे उशीर येतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जांभूळ, करवंदे विकून काही पैसे कमावणारे आदिवासी बांधव हताश झाले आहेत.
कच्च्या करवंदांना लोणच्यासाठी चांगली मागणी असते. रसायनीलगतच्या माणिक गडाच्या डोंगर रांगातील आदिवासी बांधवांना खास असे उपजीविकाचे साधन नसल्यामुळे ते पावसाळ्यात भात आणि भाजीपाल्याचे पीक घेतात; तर पावसाळ्यानंतर रसायनी, पाताळगंगा परिसरात सिंचनाचा आधार असलेले शेतकरी जमिनीत उन्हाळी मळे लावतात. तसेच, आदिवासी वाड्यांमधील अनेक आदिवासी बांधव उन्हाळ्यात करवंदे, जांभूळ, आंबे विकतात. मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात जांभूळ दाखल झाले होते. सध्या काही झाडांना अजून काहीच दिसत नाही, तसेच काहींना कमी-जास्त प्रमाणात छोटी-मोठी जांभळे आली असल्याचे दिसत आहे. दहा-पंधरा दिवसांनी झाडांना आलेली जांभळे पिकण्यास सुरुवात होईल, अशी शक्यता आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सध्याचे खराब हवामान, अवकाळी पाऊस झाल्यास फळांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
डोंगरांना वणवे लावले जात असल्याने करवंदांची झाडे जळतात. परिणामी झाडांची संख्या घटू लागली आहे. करवंदाचे पीक कच्चे तोडून आदिवासी बांधव मोहोपाडा, पनवेल, चौक बाजारात विक्रीसाठी घेऊन जातात. यंदा जांभळाचे पीक कमी दिसत आहे.
सुदाम कडपे,
कृषिमित्र







